उत्तर प्रदेशातील बरेलीमध्ये एका तरुणाने आपल्या सावत्र आईच्या डोक्यात लोखंडी रॉड मारून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हत्येचा खुलासा करताना पोलिसांनी सांगितले की, ही घटना 17 जानेवारी रोजी घडली. ही हत्या जवळच्याच कोणीतरी केली असावी, असे पोलिसांना सुरुवातीपासूनच वाटत होते. या प्रकरणाची कसून चौकशी करण्यात आली आणि पुराव्याच्या आधारे आरोपी असलेल्या सावत्र मुलाला अटक करण्यात आली. यासोबतच खुनात वापरलेला लोखंडी रॉडही जप्त करण्यात आला आहे.
न्यायालयात हजर केल्यानंतर आरोपीची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. एसपी सिटी राहुल भाटी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलाने आपल्या सावत्र आईकडे बुलेट खरेदी करण्यासाठी पैसे मागितले होते. आईने नकार दिल्यानंतर दोघांमध्ये वाद झाला. संतापलेल्या मुलाने आईच्या डोक्यात लोखंडी रॉडने दोनदा वार केल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. याशिवाय, पोलिसांनी सांगितले की, हत्येची कहाणी ट्विस्ट करण्यासाठी आरोपींनी घरात ठेवलेल्या वस्तू इकडे-तिकडे फेकून दिल्या. त्यामुळे चोरीच्या उद्देशाने ही घटना घडल्याचे तपासात पोलिसांना वाटले.
पीडितेचे कुटुंब बरेलीतील प्रसिद्ध दर्गाह आला हजरतशी संबंधित आहे. त्यामुळे या घटनेचा खुलासा करण्यासाठी पोलिसांनी अनेक पथके तयार केली होती. कोणताही मोठा वाद होऊ नये म्हणून पोलिसांनी सावधपणे काम केले. पोलिसांना यश मिळाले आणि आरोपी मुलापर्यंत पोहोचले. चौकशीत आरोपीने पोलिसांना सांगितले की, बुलेटच्या मागणीवरून आईसोबत वाद झाला होता. आईने बुलेट देण्यास स्पष्ट नकार दिला. त्यानंतर दोघांमध्ये जोरदार वाद झाला आणि रागाच्या भरात त्याने आईच्या डोक्यात वार केले. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.
हत्या केल्यानंतर आरोपींनी लोखंडी रॉड घराजवळील नाल्यात फेकून दिला होता. कोणीतरी बाहेरच्या व्यक्तीने घरात घुसून आईची हत्या केली, असे पोलिसांसमोर तो वागू लागला. त्याच्या या कृत्याचा पोलिसांना संशय आला होता. त्यानंतर त्याच्यावर नजर ठेवण्यात आली होती. हळूहळू पुरावे गोळा करून आईच्या हत्येच्या आरोपाखाली आरोपी मुलाला अटक केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.