परतवाडा (अमरावती) - अचलपूर तालुक्यातील धामणी येथील शिक्षिका शारदा बेलसरे यांच्या हत्या प्रकरणात हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. दरम्यान सोमवारी सकाळी १० वाजताच्या तब्बल चार दिवसांनंतर धामणी येथे मृताच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आरोपीच्या शोधार्थ पोलिसांनी मोहीम सुरू केली आहे.
परतवाडा-चिखलदरा मार्गावरील धामणगाव गढीनजीक अचलपूर तालुक्यातील धामणी हे आदिवासी खेडे आहे. येथील शारदा मांगीलाल बेलसरे (२७) या उच्चशिक्षित युवतीचा मृतदेह हिंगोली जिल्ह्याच्या सेनगाव तालुक्यातील हत्ता येथील साठवण तलावात शुक्रवारी सकाळी ११ वाजताच्या दरम्यान आढळून आला होता. शनिवारी अज्ञात मृतदेहाची ओळख पटल्यानंतर रविवारी या प्रकरणात मृताचा भाऊ संदीप बेलसरे यांनी सेनगाव पोलिसात तक्रार दिल्यानंतर अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. प्रेमप्रकरणातून हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज असून हत्या करणारा कोण, त्याचा शोध घेण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे. शारदा बेलसरे यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन हिंगोली जिल्हा रुग्णालयात करण्यात आले होते. त्यामध्ये गळा आवळून तिची हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अहवाल पोलिसांना प्राप्त झाला आहे.तपासणीसाठी विशेष पथकशारदा बेलसरे या शिक्षिकेच्या हत्येचा तपास सेनगाव येथील पोलीस उपनिरीक्षक बाबुराव जाधव यांच्यासह सहकारी कर्मचारी करीत आहे. तर हिंगोली येथील जिल्हा गुन्हे अन्वेषण विभागाच्या सहकार्याने त्यांनी आरोपींची शोध मोहीम चालवली आहे. मृताचा मोबाईल बेपत्ता असून तिने शेवटचा संवाद कुणाशी साधला, ती कुणाच्या संपर्कात होती? आदी सर्व बाबींचा खुलासा लवकरच होणार आहे. तर विलास पानसे हा युवक कोण? तो कोठे राहतो, याचीही चौकशी पोलिसांनी आरंभली आहे.
शारदा बेलसरे यांच्या मृत्यू प्रकरणात अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हे अन्वेषण विभागाच्या सहकार्याने तपास आरंभला आहे. चौकशीसाठी लवकरच एक पथक अमरावती जिल्ह्यात पाठविण्यात येईल. - बाबुराव जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सेनगाव