लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : घणसोलीमधील नीलम तिवारी या महिलेचा चारित्र्याच्या संशयावरून खून झाल्याचे तपासात निदर्शनास आले आहे. या प्रकरणी पती अंबुज तिवारी व त्याचा मित्र श्रीकांत चौबे याला पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांनी मृतदेह ड्रममध्ये भरून मुंबई - पुणे महामार्गावर झाडीमध्ये फेकून दिला होता.घणसोलीमध्ये राहणारे अंबुज तिवारी व नीलम तिवारी हे दोघे २२ जुलैला सायंकाळी घरातून अचानक गायब झाले होते. अंबुजच्या वडिलांनी याविषयी रबाळे पोलीस स्टेशनमध्ये हलविल्याची तक्रार नोंद केली होती. पोलिसांना २८ जुलैला अंबुज हा घणसोली परिसरात आढळला. त्याची कसून चौकशी केल्यानंतर त्याने पत्नीचा घणसोलीमधील मित्राच्या घरामध्ये ओढणीने गळा आवळून खून केल्याचे मान्य केले. चारित्र्याच्या संशयावरून हा खून केल्याचेही त्याने सांगितले. मृतदेह ड्रममध्ये भरून मित्र श्रीकांत चौबे याच्या टेम्पोमधून महामार्गावर खोपोलीजवळ झाडीत टाकला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून टेम्पोही जप्त केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस आयुक्त संजय कुमार, सहआयुक्त राजकुमार व्हटकर, उपआयुक्त पंकज डहाणे, सहायक आयुक्त विनायक वस्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गिरीधर गोरे, उमेश गवळी, सहायक पो. निरीक्षक तुकाराम निंबाळकर, प्रवीण फडतरे आदींच्या पथकाने केला.
चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून; मृतदेह ड्रममध्ये भरून मुंबई - पुणे महामार्गावर झाडीत टाकला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2020 12:38 AM