मुंब्रा - ज्याच्याशी अनैतिक संबध सुरु होते, त्याच्याशी लग्न करण्यास नकार दिला म्हणून संतप्त होऊन महिलेची हत्या करुन पसार झालेल्या इम्तियाज खान याला सव्वातीन वर्षानंतर मुंब्रापोलिसांनी अंत्यत शिताफीने मुंबईतील कुर्ला येथील राजबली दुबे चाळीतून गुरुवारी रात्री अटक केली. खुशबू मिश्र हिचे इम्तियाजशी अनैतिक संबंध होते. ती दिव्यातील आर.के.जे. कॉम्लेक्समधील तिसऱ्या माळ्यावरील रुम नंबर 307 राहत होती. तिने पतीला घटस्फोट देऊन लग्न करावे म्हणून इम्तियाजने तिच्यामागे तगादा लावला होता. खुशबू मात्र त्यासाठी तयार नव्हती. त्यामुळे संतप्त होऊन त्याने 19 ते 20 मार्च 2016 दरम्यान तिच्या राहत्या घरी गळा दाबून तिची हत्या केली होती.
व्हिसेरा तपासणीच्या अहवालामधून तिचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे उघड झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरिक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी या प्रकरणाचा कसोशीने तपास सुरु केला. मोबाइल कॉल्सच्या माध्यमातून रात्री अपरात्री खुशबू ही इम्तियाजच्या संपर्कात असल्याचे उघड झाले. तिचा नवरा घरात नसताना इम्तियाज तिच्या घरी येत होता. ही बाब साक्षीदारांच्या जबाबातून उघड झाली. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या पथकाला खान याच्या नेमक्या वास्तव्याचा ठिकाणा माहित नव्हता. मात्र, त्यानंतरही कसोशीने तपास करु न पोलिसांनी इम्तियाजचे ठिकाण शोधून त्याला अटक केली. चौकशीदरम्यान त्याने खुनाची कबुली दिली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश शिंदे करत आहेत.