अहमदनगर : उसनवारीचे पैसे मागितल्याच्या कारणावरून बाळू बजरंग पवार (वय ४० रा. कोष्टी गल्ली खर्डा ता. जामखेड ) या युवकाचा दगडाने ठेचून खून करण्याची घटना दि. २९ रोजी घडली. खर्डा येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यास बार्शी येथे दाखल केले. उपचार चालू असताना त्याचा मृत्यू दि. ३० रोजी रात्री १२ वाजता झाला. याबाबत मयताची मावशी वेणुबाई बाजीराव काळे हिने जामखेड पोलीसात फिर्याद दिली.
सुधीर बाळू वाळस्कर, आकाश बाळू वाळस्कर, योगेश बलभीम वाळस्कर, रोहित उर्फ बबलू बाळासाहेब गोलेकर, गौतम राहुल तादगे (सर्व राहणार खर्डा) या पाच जणांविरोधात खूनाचे गुन्हे दाखल करण्यात आला आहे. सर्व आरोपी फरार आहेत.सदर सर्व आरोपींना अटक करेपर्यंत मृतदेह ताब्यात घेतला जाणार नसल्याचे मयताच्या नातेवाईकांनी सांगितले. मृतदेह खर्डा येथे आहे. तसेच खर्डा बंदचे आवाहन करण्यात आले आहे. खर्डा येथे वातावरण तणावपूर्ण असून अनुचित प्रकार घडू नये म्हणून ट्रॅकींग फोर्स, राज्य राखीव पोलीस दल खर्डा येथे दाखल आहे. घटनास्थळी शेवगाव पोलीस उपअधीक्षक मंदार जावळे, पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण, निलेश कांबळे व पोलीस फौजफाटा आहे. अतिरिक्त पोलीस अधीक्षक सागर पाटील खर्डा येथे दाखल झाले आहेत.