भिवंडी : चायनीज गाडीवरील पैशाचा गल्ला पळविण्याच्या वादातून गाडीच्या मालकासह ५ जणांच्या टोळक्याने शफिक शेख (वय ३२) यांची भररस्त्यात हत्या केल्याची घटना सोमवारी रात्री भिवंडीत वंजारपट्टी नाका परिसरात घडली. या प्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्यात हत्येसह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करून ५ जणांना अटक केली.
शफिक महबूब शेख (३२, रा. म्हाडा कॉलनी) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर अफजल नूरमोहम्मद सिद्दिकी (२७), अफसर नूरमोहम्मद सिद्दिकी (२६), मो. बशीर अन्सारी (२८), नूर मोहम्मद मकदूमबक्ष सिद्दिकी उर्फ पुरीभाजीवाला उस्ताद (६४) अशी अटक आरोपींची नावे आहेत. आरोपी असलेले बापलेक हे तिघेही भिवंडीतील नदीनाका भागात राहणारे आहेत. तर आरोपींमध्ये एका साडेचौदा वर्षांच्या मुलाचाही समावेश आहे.
आरोपी अफजल नूर मोहम्मद याची वंजारपट्टीनाका परिसरात अबूजी बिल्डिंगसमोर चायनीजची गाडी आहे. या गाडीवर सोमवारी रात्री उशिरा शफिक आला होता. त्यावेळी त्याने चायनीज गाडीवर काम करणाऱ्या कारागिराशी वाद घातला. त्यानंतर गाडीवरील पैशाचा गल्ला पळविला असता, पाचही आरोपींनी शफिकला रस्त्यावरच पकडून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. मारहाणीनंतर शफिकला भिवंडीतील स्व. इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
नातेवाइकांचा गोंधळशफिकच्या नातेवाइकांनी घटनास्थळी गोंधळ घातला होता. त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. निजामपूर पोलिसांनी पंचनामा करीत हत्येसह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करून मंगळवारी सकाळी पाचही आरोपींना अटक केली. पुढील तपास सपोनि जमीर शेख करीत आहेत.