जर तुम्हाला कोणी सांगितले की एखाद्या व्यक्तीची हत्या झालीय ती व्यक्ती तुम्हाला झोमॅटोकडून जेवन देण्यासाठी येत आहे, तर... वाट लागेल ना. विश्वासही बसणार नाही ती गोष्ट वेगळी. पण झाशीमध्ये हा प्रकार घडला आहे. एका तरुणाची हत्या झाली होती. त्याच्या हत्येप्रकरणी तीन महिन्यांपूर्वी फतेहपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. तोच व्यक्ती झोमॅटोमध्ये नोकरी करताना पकडला गेला आहे. त्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
फतेहपूरमध्ये राहणारे झिया उर रहमान याचे 2001 मध्ये उन्नाव येथील रहिवासी असलेल्या सुफिया खातूनसोबत लग्न झाले होते. दोघांना एक मुलगाही आहे. लग्न झाल्यापासून पती-पत्नीमध्ये दुरावा निर्माण झाला होता. काही वर्षांपूर्वी सुफिया खातून यांनी झिया उर रहमान यांच्यावर हुंडा मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. वादाला कंटाळून झिया उर रहमान दीड वर्षांपूर्वी घरातून पळून गेला होता. तेथून त्याने झाशी गाठली आणि झोमॅटोमध्ये काम करण्यास सुरुवात केली.
झाशी पोलिसांनी सांगितले की, झिया बेपत्ता झाल्यापासून त्याची आई त्रस्त झाली होती. आईने तीन महिन्यांपूर्वी कोर्टामार्फत सून आणि तिच्या कुटुंबीयांवर खुनाचा गुन्हा दाखल केला होता. पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते. त्याला शोधण्यासाठी तपास पथकेही पाठविण्यात आली होती. त्याच्या कुटुंबाने त्याला मृत झाल्याचेच मानले होते. परंतू, त्याच्या मुलाला सुगावा लागला. त्याने पोलिसांना फोन करून बाप कुठे आहे, याची माहिती दिली. तो झाशीला असल्याचे सांगितले. यानंतर झाशीच्या पोलिसांना कळविण्यात आले. पोलिसांनी रहमानला पकडले. यानंतर फतेहपूरचे पोलीसांनी त्याला ताब्यात घेतले.