डोंबिवली: जळगाव जिल्हयातील भुसावळ येथे मित्राच्या मदतीने खून करून पलायन केलेल्या दोघांपैकी एकाला कल्याण गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी सापळा लावून सोमवारी डोंबिवलीतअटक केली. सागर दगडू पाटील (वय २३) रा. खडका, भुसावळ असे अटक आरोपीचे नाव आहे. पुर्ववैमनस्यातून त्याने आणि त्याचा मित्र राहुल नेहते या दोघांनी भुसावळ येथे रोहीत दिलीप कुपेकर याच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केल्याची कबुली चौकशीत दिली आहे. राहुल हा सुरत येथे पळून गेला असून सागर हा खून केल्यावर डोंबिवलीत उमेशनगरमध्ये मित्राकडे पळून आला होता.
रोहीत हा ३० मे पासून घरातून बेपत्ता होता. त्याबाबत भुसावळ येथील बाजारपेठ पोलिस ठाण्यात मिसिंग तक्रार दाखल होती. दरम्यान रविवारी ५ जूनच्या सकाळी एका २२ वर्षीय तरूणाचा निर्घुण खून करून त्याचा मृतदेह शेतात फेकल्याची घटना उघडकीस आली. मृतदेह सांगडयाचा अवस्थेत आढळुन आला होता. दरम्यान पायातील चप्पल आणि पॅन्ट यावरून तो मृतदेह बेपत्ता असलेल्या रोहीतचा असल्याचे निष्पन्न झाले.
दरम्यान भुसावळ येथे मित्राच्या मदतीने खून करून एकजण डोंबिवली पश्चिमेकडील उमेशनगर नाका येथे आलेला आहे अशी माहीती कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस शिपाई गुरूनाथ जरग यांना खब-यामार्फत मिळाली. त्यानुसार वरीष्ठ पोलिस निरिक्षक किशोर शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक आनंद रावराणे, पोलिस उपनिरिक्षक मोहन कळमकर, सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक संजय माळी, पोलिस हवालदार विश्वास माने, बापुराव जाधव, पोलिस नाईक गोरखनाथ पोटे, पोलिस शिपाई गुरूनाथ जरग, मिथुन राठोड, पोलिस हवालदार अमोल बोरकर आदिंच्या पथकाने सोमवारी सकाळी सापळा लावून सागरला अटक केली. त्याला भुसावळमधील बाजारपेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहीती शिरसाठ यांनी दिली.