मुंबई : मालकिणीचे अन्य इसमाशी अनैतिक संबंध असल्याच्या संतापातून वाहनचालकाने तिच्यासह तिच्या एका मुलीची विळ्याने वार करून हत्या केल्याची तसेच त्यानंतर तिच्या दुसऱ्या अल्पवयीन मुलीसह गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना कांदिवली (पश्चिम) येथे उघडकीस आली.वाहनचालकाने कौटुंबिक कलहाला कंटाळून हे हत्याकांड घडवून आणल्याचे त्याच्याकडे सापडलेल्या चार पानी सुसाइड नोटमधून उघड झाले आहे. किरण दळवी (४५), मुस्कान दळवी (२६), भूमी दळवी (१७) आणि शिवदयाल सेन (६०) अशी मृतांची नावे आहेत. किरण यांना पहिल्या पतीपासून मुस्कान ही मुलगी असून विभक्त झाल्यावर त्यांनी आशिष यांच्याशी लग्न केले. त्यांच्यापासून झालेली त्यांची मुलगी भूमी ही किरणसोबतच राहत होती, तर एका मुलासह आशिष यांनी इंदूरला स्वतःचा व्यवसाय थाटला होता.आशिष यांचे वडील डॉक्टर होते. दळवी मार्गावरील रुग्णालय त्यांच्या मालकीचे होते. मात्र, ते १५ वर्षांपासून बंद होते. किरणसोबत पटत नसल्याने ते सोबत राहत नव्हते. आशिष यांनीच वाहनचालक सेन यांना दहा वर्षांपूर्वी नोकरीवर ठेवले होते. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, किरणचे अन्य व्यक्तीसोबत अनैतिक संबंध होते. ती बाब प्रामाणिकपणे सेवा बजावणारे सेन तसेच भूमी यांना पटत नव्हती. त्यावरून माय-लेकीत वादही व्हायचे. मात्र, किरण यांनी त्यांचे ऐकले नाही.
‘ती’ काळरात्र आणि रक्ताचा सडा- मंगळवारी रात्री साडेअकराच्या सुमारास वाहनचालक सेन आणि भूमी यांनी ठरल्याप्रमाणे दळवी इमारतीचे मुख्य प्रवेशद्वार आतून बंद केले. त्यानंतर सेन याने धारदार विळ्याने किरणवर हल्ला केला. त्यांनी आरडाओरड केल्यावर आईला वाचविण्यासाठी मुस्कान पुढे आली. - मात्र, त्याने तिच्यावरही हल्ला चढवला. त्या दोघी जीव वाचविण्यासाठी पहिल्या मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर धावत होत्या. मात्र, सेनने त्यांच्यावर सपासप वार करणे सुरूच ठेवले. अखेर गंभीर जखमी झाल्याने त्या दुसऱ्या मजल्यावरच रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्या. तिथेच त्यांचा मृत्यू झाला. - हत्येनंतर भूमी आणि सेन यांनी पहिल्या मजल्यावर गळफास घेत आत्महत्या केली. पोलीस निरीक्षक दीपशिखा वारे ज्यावेळी त्यांच्या पथकासह घटनास्थळी दाखल झाल्या तेव्हा त्यांना संपूर्ण घराच्या फरशीवर, भिंती, भांडी, कपडे, कपाट तसेच शिड्यांवर रक्ताचा सडा पसरल्याचे दिसले.
मृतदेह ओळखणाऱ्याचा जबाब नोंददळवी कुटुंबीयांना पोलिसांनी याबाबत कळविले आहे. त्यांचे नातेवाईक शहरात राहत नाहीत. चारही मृतदेह हे शवविच्छेदनासाठी कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात पाठविण्यात आले असून कुटुंबीय आल्यावर मृतदेह त्यांच्या स्वाधीन करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. यात खुनाचा गुन्हा नोंदवण्यात येणार असून मृतदेह ओळखण्यासाठी नागेश्वर ठाकूर नामक व्यक्तीची मदत घेण्यात आली होती. त्यांचाही जबाब नोंदविला जाणार असल्याचे पोलिसांनी नमूद केले.