गिरीडीह – झारखंड येथील एका युवकाच्या हत्यांकांड प्रकरणाचा पोलिसांनी ३ दिवसांत छडा लावला आहे. या प्रकरणात पती-पत्नी दोघांना अटक करून जेलमध्ये पाठवलं आहे. ज्या धारदार शस्त्राचा वापर हत्येसाठी करण्यात आला तेदेखील पोलिसांनी जप्त केले आहे. या हत्येसाठी जबाबदार असणाऱ्या पती-पत्नीला गुरुवारी पोलिसांनी अटक केली. त्यानंतर या महिलेने जे सांगितलं ते ऐकून पोलिसांनाही धक्का बसला.
अटक केलेल्या आरोपी महिलेने दावा केला आहे की, हबीबुल्लाह नावाच्या युवकाने माझ्यावर बलात्कार केला होता. त्यामुळे त्याची हत्या केली. महिलेने पतीला वाचवण्यासाठी अन्य २ युवकांची नावे घेतली आहेत. परंतु या युवकांवरील आरोपाचे पुरावे मिळाले नाहीत. त्यामुळे या दोघा युवकांना ताब्यात घेतलं आहे. रविवारी हबीबुल्लाह हा आपल्या पत्नीला माहेरी सोडून गावी परत आला होता. तेव्हा गावात एका लग्नात सहभागी होण्यासाठी तो घराबाहेर पडला.
जेव्हा हबीबुल्लाह रात्री उशीर झाला तरी घरी परतला नाही तेव्हा त्याच्या वडिलांनी त्याच्या मोबाईलवर फोन केला. परंतु फोन बंद लागत होता. तेव्हा वडिलांना वाटलं की तो लग्नस्थळी राहिला असावा. मात्र दुसऱ्या दिवशी शेतात हबीबुल्लाहचा मृतदेह सापडला. या घटनेने गावात खळबळ माजली. खुखरा पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहचले. पोस्टमोर्टमनंतर हबीबुल्लाहच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. हबीबुल्लाहच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला.
या घटनेचा तपास करताना पती-पत्नीबद्दल पोलिसांना संशयास्पद माहिती मिळाली. त्यानंतर आरोपींना ताब्यात घेतलं. कसून चौकशी केल्यानंतर पती-पत्नीने गुन्ह्याची कबुली दिली. हबीबुल्लाहनं माझ्यावर बलात्कार केला होता त्यामुळे त्याची हत्या केल्याचा आरोप महिलेने केला. मात्र बलात्कार झाला असेल तर पोलिसांना माहिती का दिली नाही? हा प्रश्न अनुत्तरीतच आहे. लग्नाच्या दिवशी महिलेने युवकाना फोन करून भेटण्यासाठी बोलावलं. त्यानंतर महिलेने पतीसोबत मिळून युवकाची हत्या केली. ज्यादिवशी हबीबुल्लाहचा मृतदेह सापडला तेव्हा तो अंत्यंत वाईट स्थितीत होता. मयत व्यक्तीचा गळा कापण्यात आला होता तसेच त्याच्या गुप्तांगालाही मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते. यामुळे पोलिसांनीही घटनेचे गांभीर्य ओळखून जलदगतीने तपास केला.
वडिलांनी केली न्याय देण्याची मागणी
हबीबुल्लाहच्या हत्येसाठी जबाबदार असणाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी त्याच्य्या वडिलांनी केली आहे. हबीबुल्लाहच्या मागे त्यांची एक वर्षाची मुलगी स्लामुन आणि पत्नी सादिकाच्या देखभालीची चिंता वडिलांना लागली आहे. हबीबुल्लाहची आई सध्या आजारी आहे. घरात आर्थिक तंगी सुरू आहे. माझा मुलगा जास्त शिकलेला नव्हता. गुजरातमध्ये एका हॉटेलमध्ये काम करत होता. लॉकडाऊन लागल्याने तो घरी परतला होता अशी माहिती वडिलांनी दिली.