वर्धा : शहरातील मुथ्थूट फिनकॉर्प फायनान्स कंपनीत गुरुवारी १७ रोजी दरोडा पडला होता. दरोडेखोरांनी तब्बल साडेतीन लाख रुपये रोकड आणि ९ किलो ७०० ग्रॅम सोने चोरून नेले होते. वर्धा पोलिसांनी पाच दरोडेखोरांना अटक करुन अडीच किलो सोने जप्त केले. पोलीस कोठडी दरम्यान दरोडेखोरांकडून ३७९ सोन्यािची पाकिटं जप्त करण्यात आली. जप्त केलेल्या सर्व सोन्याच्या पाकिटांचे मंगळवारी शहर पोलीस ठाण्यात बंद खोलीत इनकॅमेरा मोजमाप करण्यात आले. सकाळी ९ वाजतापासून सुरु असलेली मोजमापाची प्रक्रिया रात्री ९ वाजेपर्यंत सुरुच होती.
गुरुवारी १७ रोजी वर्ध्यातील मुथ्थूट फायनान्स कंपनीत सकाळी ९ वाजताच्या सुमारास बंदुकीच्या धाकावर सशत्र दरोडा टाकण्यात आला. या घटनेने संपूर्ण शहरात खळबळ उडाली होती. पोलिसांनी अवघ्या काही तासांतच दरोड्यातील आरोपी कुणाल शेंदरे, मनीष घोळवे, जीवन गिरडकर, कुशल आगसे, महेश श्रीरंग यांना अटक केली. त्यांच्याकडून २०० पाकिट सोनं अस अडीच किलो सोनं जप्त केले होते. आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने २३ पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.पोलीस कोठडीदरम्यान केलेल्या चौकशीत पोलिसांनी आरोपींकडून लपवून ठेवलेली ३७९ सोन्याची पाकिटं त्यांच्याकडून हस्तगत केली. त्यामुळे पोलिसांनी एकूण जप्त केलेल्या ३७९ सोन्याच्या पाकिटांचे मोजमाप शहर ठाण्यातील बंद खोलीत मंगळवारी सकाळी ९ वाजतापासून रात्री उशिरापर्यंत सुरु होते.तीन अधिकारी १० कर्मचाऱ्यांकडून तपासणीशहर पोलीस ठाण्याच्या खोलीत गोपनीय पद्धतीने पोलीस विभागाचे तीन अधिकारी आणि दहा कर्मचारी तसेच मुथ्थूट फायनान्स कंपनीतील अधिकारी, चार गोल्ड ऑफिसर यांच्याकडून मोजणी सुरु होती. रात्री आठ वाजेपर्यंत २०० पाकिटांतील सोन्याची मोजणी झाल्याचे पोलिसांनी सांगितले असून उर्वरित सोन्याचे मोजमाप सुरु असल्याचे सांगितले.