भोपाळ – मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये घडलेल्या एका घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे. याठिकाणी पत्नीच्या जाचाला कंटाळून पतीने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. पत्नीमुळे त्रस्त झालेला पती घरी न जाता आत्महत्या करण्यासाठी रेल्वे ट्रॅकवर पोहचला. त्याने सुसाईड करत असल्याची माहिती स्वत: पोलिसांना फोन करुन दिली. माझ्या मृत्यूनंतर पत्नीला शिक्षा द्या, मी आयुष्य संपवतोय असं त्याने पोलिसांना सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार, एका युवकाने १०० नंबरवर कॉल करुन तो त्याच्या पत्नीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करण्यासाठी रेल्वे ट्रॅकवर बसल्याचं सांगितलं. माझ्या मृत्यूनंतर माझ्या पत्नीला शिक्षा व्हावी यासाठी त्याने कॉल केल्याचं सांगितले. हा कॉल आल्यानंतर पोलिसांनी तात्काळ युवकाचे लोकेशन ट्रेस करत त्याला शोधण्याचा प्रयत्न केला. लोकेशन कन्फर्म झाल्यानंतर कंट्रोल रुममधून जवळील रेल्वे स्टेशन आरपीएफला सूचना केली. तोपर्यंत या युवकाला मोबाईलच्या बोलण्यावर व्यस्त ठेवले.
जवळपास दीड तासानंतर गौतम नगर पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या रेल्वे ट्रॅकवर कॉल करणाऱ्या युवकाला शोधण्यात पोलिसांना यश आले. पोलीस कर्मचाऱ्यांनी जेव्हा त्या व्यक्तीला आत्महत्या करण्याचं कारण विचारलं तेव्हा त्याला घरी जायचं नाही असं तो वारंवार सांगत होता. युवक सातत्याने पत्नीवर छळाचा आरोप करत आत्महत्या करणार असल्याचं म्हणत होता. पोलिसांनी अखेर या युवकाची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर युवकाला पोलीस ठाण्यात आणून त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात सुपूर्द केले.