मुंबई : अंटालिया बॉंस्बस्फोटके प्रकरणी चौकशी करण्याकरिता निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याचा ताबा देण्यास विशेष न्यायालयाने एनआयएला सोमवारी नकार दिला. तर दुसरीकडे न्यायालयानेसचिन वाझे याला हृदयाच्या आजाराशी संबंधी खासगी रुग्णालयात उपचार घेण्याची परवानगी दिली.
खासगी रुग्णालयात करण्यात येणाऱ्या उपचाराचा खर्च वाझे व त्याच्या कुटुंबिय करेल, असे विशेष एनआयए न्यायालयाने स्पष्ट केले. वाझे सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. खासगी रुग्णालयात उपचार घेण्याची परवानगी मिळावी यासाठी वाझे याने त्यांच्या वकिलामार्फत विशेष न्यायालयात अर्ज केला आहे. आपल्या तीन धमन्यांमध्ये ९० टक्क्यांहून अधिक ब्लॉकेज आहेत. डॉक्टरांनी तत्काळ शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला आहे. आपल्याला स्टॅन स्वामी यांच्याप्रमाणे कारागृहातच अंतिम श्वास घ्यायचा नाही. त्यामुळे खासगी रुग्णालयात उपचार करण्याची परवानगी द्यावी, असे वाझे याने अर्जात म्हटले आहे.
गेल्या आठवड्यात एनआयएने अंटालिया प्रकरणी वाझे याची चौकशी करण्यासाठी दोन दिवसांचा ताबा मिळावा, यासाठी विशेष न्यायालयात अर्ज केला होता. तसेच सहआरोपी सुनील माने याची पाच दिवसांचा ताबा मिळावा, अशीही विनंती केली होती. वाझे, माने व अन्य आठ आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. साक्षीदारांनी दिलेल्या जबाबाबरोबर वाझे व माने यांचे जबाब तपासून पाहायचे आहेत, असे म्हणत एनआयएने वाझे व माने यांचा ताबा मागितला होता. मात्र, सोमवारी विशेष न्यायालयाने वाझे व माने यांचा ताबा देण्याची एनआयएची विनंती मान्य केली.
अंटालियाजवळ स्फोटकांनी भरलेली कार ठेव्याबद्दल तसेच ठाण्याचा व्यावसायिक मनसुख हिरे याची हत्या केल्याबद्दल वाझे याला एनआयएने २५ फेब्रुवारी रोजी अटक केली.