नवी दिल्ली – तिने आईस्क्रीम खाल्ली अन् मृत्यू झाला. गुरुग्रामच्या खासगी हॉस्पिटलमध्ये याचीच चर्चा आहे. मृतक युवती रोजी संगमा ही मेघालयच्या दीमापूर येथे राहणारी होती. एअर होस्टेस म्हणून ती काम करायची. तिच्या मृत्यूवरून अनेक प्रश्न विचारले जात आहेत. हे प्रकरण सोशल मीडियावर सॅमुअल संगमा याने व्हायरल केले. एअर होस्टेस रोजी संगमा ही सॅमुअल संगमाची मावशी होती.
रोजी संगमाच्या मृत्यूनंतर २४ तासांतच सॅमुअल संगमा याचाही संशयास्पद मृत्यू झाला. दिल्लीच्या एका हॉटेलमध्ये सॅमुअल संगमाचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. या दोघांच्या मृत्यूनंतर सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे. आता या प्रकरणी मेघालयच्या एका खासदाराने गृह मंत्रालयाला पत्र पाठवून तपास करण्याची मागणी केली आहे. सध्या दिल्ली पोलीस आणि गुरुग्रामचे क्राईम ब्रांच या घटनेचा तपास करत आहेत.
काय आहे प्रकरण?
दीमापूर येथे राहणारा सॅमुअल संगमा आणि तिची मावशी रोजी संगमासोबत दिल्लीतील बृजवासन परिसरात भाड्याच्या घरात राहत होते. २३ जूनच्या रात्री अचानक रोजी संगमाच्या हातापायात प्रचंड वेदना होऊ लागल्या. त्याचसोबत तिच्या प्रायव्हेट पार्टमधून रक्त येऊ लागले. त्यानंतर सॅमुअल संगमाने तात्काळ तिला खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. तिथे प्रकृती गंभीर होत चालल्याने तिला २४ जून सकाळी ६ वाजता गुरुग्रामच्या अल्फा हॉस्पिटलला आणण्यात आले.
सॅमुअल संगमाने एका व्हिडीओत दावा केला आहे की, माझ्या मावशीची तब्येत सुधारत होती परंतु हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये रोजी संगमा यांना डॉक्टरांच्या उपस्थितीत आईस्क्रीम खायला दिलं. आईस्क्रीम खाल्ल्यानंतर तिची तब्येत परत खराब झाली. यातच तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी आम्ही व्हिडीओ बनवला असता डॉक्टरांनी मला बेदम मारहाण करत हॉस्पिटलच्या बाहेर काढून टाकलं. रोजी संगमाच्या मृत्यूनंतर सॅमुअल खूप त्रस्त होता. परंतु तो आत्महत्या करू शकत नाही असं सॅमुअलचे वडील म्हणाले.
२५ जून रोजी सकाळी ५.३० वाजता आमचं फोनवर बोलणं झालं. त्यावेळी सॅमुअल रोजीला न्याय देण्याची भाषा करत होता. सॅमुअल म्हणाला होता की, काहीही झालं तरी रोजी संगमाला न्याय दिल्याशिवाय गप्प बसणार नाही. जो व्यक्ती न्याय देण्याची भाषा करत होता तो अचानक आत्महत्या का करू शकतो? असा सवाल सॅमुअलच्या वडिलांनी विचारला आहे. तसेच सॅमुअल आणि रोजी यांना न्याय देण्याची विनवणी मेघालय सरकारला आणि केंद्र सरकारला करत आहे.
अल्फा हॉस्पिटलचं म्हणणं काय?
रोजी संगमाला ब्लीडिंग होत असल्याने हॉस्पिटलला आणलं होतं. तिला आयसीयूत भरती केले त्यानंतर काही काळात ती बरी झाली. २४ जून सकाळी ११ वाजता आयसीयूत एक रुग्ण आईस्क्रीम खात होता. तेव्हा रोजीने ते पाहून तिलाही आईस्क्रीम खाण्यासाठी मागितले. रोजीनं तिच्या मर्जीने आईस्क्रीम खाल्लं होतं. तसेच सॅमुअलला कोणीही मारहाण केली नव्हती असा दावा डॉक्टरांनी केला आहे.
हॉस्पिटलवर संशय
अल्फा हॉस्पिटलचा दावा होता की, रोजीची प्रकृती चिंताजनक आहे असं असतानाही तज्ज्ञ डॉक्टरांना का बोलावण्यात आलं नाही? १० वाजता रोजीची तब्येत खूपच बिघडली तेव्हा पोलिसांना सूचना का केली नाही. आयसीयूत आईस्क्रीम खाण्यासाठी मनाई का केली नाही? सॅमुअल संगमाची आत्महत्या आहे मग त्याच्या चेहऱ्यावर मारहाणीच्या खूना कशा? पहाटे ५.३० वाजता सॅमुअलचं त्याच्या कुटुंबीयांसोबत बोलणं झालं.तो रोजीला न्याय देण्याची भाषा करत होता मग अचानक आत्महत्या कशी केली? अशा विविध प्रश्नांची उत्तरं तपासातून मिळणं गरजेचे आहे.