झारखंडच्या रांचीमधून दोन सख्ख्या बहीणींनी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या दोन्ही बहीणींनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे. पोलीस आणि एफएसएलच्या टीमने तपास सुरु केला आहे. या घटनेमुळे परिसरात सर्वच हैराण झाले आहेत. पोलीस ही आत्महत्या की हत्या याचा शोध घेत आहेत.
मोठी बहीण शीतल लखानी रांचीच्या एका हॉस्पिटलमध्ये काम करते. तर तिची छोटी बहीण मान्या ही सरला बिर्ला स्कूलमध्ये 9 वी इयत्तेत शिकत होती. त्यांचे वडील संजय लखानी हे रांचीच्या मोठ्या कंत्राटदारांपैकी एक आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री मोठी बहीण शीतल हिचा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यानंतर रात्री दोन्ही बहिणी खोलीत झोपायला गेल्या. सर्व काही ठीक असल्याचे नातेवाईकांनी सांगितले. मात्र, सकाळी दोघांचेही मृतदेह खोलीतून सापडले. दोघांनाही तातडीने गुरुनानक रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिथे डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केले. मोठी मुलगी शीतल लखानी हिचे लग्न पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात होणार होते. ६ महिन्यांपूर्वी तिचा एचडीएफसी बँकेत काम करणाऱ्या तरुणाशी साखरपूडा झाला होता. दोन्ही बहिणींनी आत्महत्या का केली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. एक दिवसापूर्वी त्यांच्या घरातील पाळीव कुत्र्याचाही मृत्यू झाला होता. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी रिम्समध्ये पाठवण्यात आले आहेत. आत्महत्या की खून या सर्वच बाजूंनी पोलीस तपास करत आहेत. रात्री बर्थडे सेलिब्रेट करून दोन्ही बहिणी आपल्या खोलीत गेल्याचे स्थानिक लोकांनी सांगितले. पहाटे 5.40 च्या सुमारास तिच्या आईने खोली उघडली असता दोन्ही बहिणींना उलट्या झाल्या होत्या व त्या बेशुद्धावस्थेत पडल्या होत्या.
रांची ग्रामीण एसपी नौशाद आलम यांनी सांगितले की, ज्या खोलीत दोन्ही बहिणींचे मृतदेह सापडले होते ती एफएसएल तपासणीनंतर सील करण्यात आली आहे. याशिवाय मोठ्या बहिणीचे लग्न ठरले असून वाढदिवसाला तिचा होणारा नवराही आला होता. मात्र, वाढदिवस साजरा करून तो त्याच्या घरी परतला असल्याचे नातेवाइकांनी सांगितले आहे.