चंदगड : अमली पदार्थ तस्करीबाबत ढोलगरवाडी ता.चंदगड येथे सुरू असलेली कारवाई सोमवारीही पूर्ण न झाल्याने याप्रकरणाचे गूढ वाढले असून कोट्यवधीचा मुद्देमाल हाती लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाकडे एका महिले विरोधात गुन्हा नोंद झाल्याने तिला ताब्यात घेतल्यावर ढोलगरवाडी येथील एका फार्म हाऊसवर एमडी नामक अमली पदार्थ तस्करीसंदर्भात माहिती मिळताच रविवारी मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने सदर फार्म हाऊसवर छापा टाकला. सदर कारवाई गेले दोन दिवस सुरू आहे. कारवाईला विलंब लागत असल्याने मोठ्या प्रमाणात मुद्देमाल हाती लागल्याची शक्यता आहे.
एमडी नामक अमली पदार्थाचे ढोलगरवाडी कनेक्शन स्पष्ट होण्यासाठी गुन्हे अन्वेषण विभागाने र्गह खात्याचे व नार्कोटिस्कचे पथक येण्यास विलंब झाल्याने सोमवारी तपास पूर्ण झाला नाही. पण तपासासाठी लागणार वेळ व कमालीची गुप्तता यामुळे मोठे प्रकरण उघडकीस येण्याची शक्यता आहे.
फार्म हाऊस मालकाकडून ग्रामस्थांची दिशाभूलढोलगरवाडी येथील फार्म हाऊसमध्ये त्या मालकांने म्हशी, घोडे व कोंबड्याचे पालन सुरू असल्याचे चित्र स्थानिकांसमोर उभे केले होते. पडद्याआड मात्र अमली पदार्थ तयार करण्याचे काम सुरू ठेवले होते. त्यामुळे याबाबत ग्रामस्थ अद्यापही अनभिज्ञ आहेत.