मनसुख हिरण यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाचा तपास सुरु असतानाच त्यांची पत्नी विमला यांनी पती आत्महत्या करुच शकत नसल्याचे सांगितले. तसेच गुरूवारी नेहमीप्रमाणे कांदिवीच्या गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्याने बोलावल्याचे सांगून ते घराबाहेर पडले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांचा मृतदेह सापडल्याची बातमी कानावर पडल्याचे सांगितले आहे. मुंब्रा येथील रेतीबंदर खाडीत आज सकाळी १०. ३० वाजताच्या सुमारास मनसुख यांचा मृतदेह सापडला, तेव्हा त्यांच्या तोंडावर लावलेल्या मास्कमध्ये खूप सारे हातरुमाल सापडले. त्यामुळे त्यांच्या मृत्यूबाबतचा संशय आणखीन बळावला आहे. याबाबत पोलिस अधिक तपास करत आहेत.
प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांच्या दक्षिण मुंबईतील अँटिलीया निवासस्थानासमोर सापडलेल्या स्कॉर्पिओचा मालक मनसुख यांचा मृतदेह मुंब्रा येथील रेतीबंदर या ठिकाणी आज आढळून आला. त्यामुळे एकच खळबळ माजली आहे. गुरूवारी रात्री पावणे आठच्या सुमारास मनसुख हिरेन यांचा मुलगा नेहमीप्रमाणे दुकानात जेवणाचा डब्बा घेवून आला. जेवण उरकून साडे आठच्या सुमारास मुलाला दुकानातच थांबवून मनसुख यांनी मी बाहेर जाऊन येतो असे सांगून दुचाकीवरून गेले होते, अशी माहिती त्यांच्या दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने दिली आहे. अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर संशयास्पद स्थितीत आढळून आलेल्या स्कॉर्पिओ कारबाबत कारमालकाची पोलीस चौकशी सुरु होती. मात्र, मानसिक स्थिती ठिक नसल्याबाबत ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर आणि मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना मनसुख हिरेन यांनी लेखी पत्र दिले असल्याचीही माहिती समोर येत आहे.
तसेच मनसुख हिरण (५०) हे ठाण्यातील याच विकास पाम इमारतीच्या ए विंगमधील चौदाव्या मजल्यावर वास्तव्यास होते. या इमारतीतील त्यांचे मित्र आणि व्यवसायातील मंडळी हिरण आत्महत्या करूच शकत नाही असा दावा करत आहेत. तसेच त्यांची पत्नी विमल देखील हिरण आत्महत्या करूच शकत असल्याचं ठामपणे सांगत आहे आणि हिरण यांच्या तोंडात कोंबलेले हातरुमाल संशय निर्माण करत आहेत. त्यामुळे हिरण यांच्या मृत्यूचे गूढ वाढले आहे.