अंबरनाथ : अंबरनाथच्या गायकवाड पाडा परिसरात काही दिवसांपूर्वी एका बंद घरात महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणी उल्हासनगर गुन्हे शाखेने तपास करत या महिलेच्या पतीला बेड्या ठोकल्या आहेत. चारित्र्याच्या संशयावरून पतीनेच पत्नीची हत्या केल्याचे समोर आले आहे.
गायकवाड पाडा परिसरातील भागूबाई चिकणकर चाळीत २२ ऑगस्ट रोजी एका महिलेचा मृतदेह आढळला होता. मृतदेहाचा चेहरा जाळण्यात आल्यानंओळख पटत नव्हती. मात्र उल्हासनगर गुन्हे शाखेनं केलेल्या तपासात या महिलेचे नाव सुशीला साहेबराव निकाळजे उर्फ काजल असल्याचे समोर आले. २५ वर्षीय काजल ही तिचा पती सुरज आनंद खरात याच्यासोबत राहात होती. मात्र सुरज हा काजलच्या चारित्र्यावर वारंवार संशय घेत असल्याने त्यांच्यात वाद होत होते. याच वादातून सुरज याने काजलचा लेसने गळा आवळून खून केला आणि तिची ओळख पटू नये यासाठी तिचा चेहरा जाळला. यानंतर घराला कुलूप लावून सुरज फरार झाला.
घरमालकाने घरातून दुर्गंधी येऊ लागल्यानंतर पोलिसांना बोलावत दरवाजा तोडला असता हा प्रकार समोर आला. यानंतर शिवाजीनगर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. तर उल्हासनगर गुन्हे शाखेने याप्रकरणी समांतर तपास करत सुरजच्या मुसक्या आवळल्या. त्याच्या चौकशीत त्याने पत्नी काजलच्या हत्येची कबुली दिली. यानंतर त्याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट ४ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे यांनी दिली आहे.