लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : नांदेडातील अनेक व्यापारी, डॉक्टर आणि उद्योजकांनी २०१७ मध्ये आपल्याकडील बिटकॉइन प्रति महिना १० टक्के व्याजदर मिळण्याच्या आमिषाने गेन बिटकॉइनला दिले होते. सुरुवातीला काही महिने गेन बिटकॉइनने आकर्षक व्याजदरही दिले. नंतर मात्र गुंतवणूकदारांची फसवणूक केली. यात नांदेडातून जवळपास ५०० कोटी रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती आहे.
२०१७ मध्ये या प्रकरणात नांदेडात पहिला गुन्हा दाखल झाला होता. गेन बिटकॉइनचा मुख्य निर्माता अमित भारद्वाज हा या प्रकरणात आरोपी होता. भारद्वाजने नांदेडात शिक्षण घेतले होते. या ओळखीचा फायदा उचलत त्याने गेन बिटकॉइन या डिजिटल चलनात गुंतवणूक करण्यासाठी अनेकांना आमिष दाखविले. नांदेडातील अनेकांनी भारद्वाज याच्यासोबत करार करून आपले बिटक्वॉइन गेन बिटकॉइन या कंपनीला दिले. त्या बदल्यात भारद्वाज हा दर महिन्याला गुंतवणूकदारांना १० टक्के व्याज देणार होता.
भारद्वाजने अनेकांना आमिष दाखवित घातला गंडा सुरुवातीचे काही महिने भारद्वाजने नियमितपणे गुंतवणूकदारांना व्याज दिले. त्यामुळे त्याच्यावर विश्वास ठेवून नांदेडातील अनेकांनी गुंतवणूक केली. परंतु त्यानंतर भारद्वाजने या मंडळींची फसवणूक केली. त्यानंतर तो थेट दुबईत पळाला होता. भारद्वाज याच्या विरोधात देशभरात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल झाले होते. देशात आल्यानंतर त्याला अटकही करण्यात आली होती.नांदेड पोलिसांनीही त्याचा ताबा मिळविला होता. मध्यंतरी भारद्वाज याचा मृत्यू झाल्याने सर्व गुंतवणूकदार धास्तावले होते. आता या प्रकरणात सीबीआयकडून देशातील ६० ठिकाणी धाडसत्र सुरू करण्यात आले आहे. त्यात नांदेडचाही समावेश आहे.
नांदेडातच घेतले शिक्षणअमित भारद्वाज हा नांदेडातील एमजीएम महाविद्यालयात शिकत होता. त्यामुळे नांदेडातील अनेकांच्या संपर्कात तो होता. त्याने गेन बिटकॉइन कंपनी सुरू केल्यानंतर अनेकांनी त्यात गुंतवणूक केली होती. नांदेडातील एका डाॅक्टरने तर ५० लाख रुपयांचे बिटकॉइन भारद्वाजला दिले होते.