नफे सिंह राठी यांच्या हरियाणातील बहादूरगडमध्ये झालेल्या हत्येमुळे खळबळ उडाली असून राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. हल्लेखोरांनी सुमारे 50 राऊंड गोळीबार केला आणि या हल्ल्यात नफे सिंह आणि त्यांच्या एका सुरक्षा कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर तीन खासगी सुरक्षा रक्षक देखील जखमी झाले. नफे सिंह यांच्यावर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. कारमध्ये पाच जण होते.
या घटनेबाबत वाहन चालक आणि नफे सिंह राठी यांचा भाचा राकेश उर्फ संजय यांच्या माहितीवरून बहादुरगडच्या लाइनपार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माजी आमदार नरेश कौशिक यांच्यासह सात जण आरोपी आहेत. गुन्हा केल्यानंतर हल्लेखोरांनी वाहन चालक व नफे राठी यांचा भाचा राकेश उर्फ संजय सिंह याच्याकडे जाऊन "आम्ही तुला जिवंत सोडतोय, जा आणि हे त्यांच्या घरी सांग" अशी धमकी दिली.
चालकाने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. राकेश उर्फ संजयच्या माहितीवरून पोलिसांनी माजी आमदार नरेश कौशिक, माजी सभापती व विद्यमान सभापती सरोज राठी यांचे पती रमेश राठी आणि सासरे कर्मवीर राठी, मेहुणा कमल राठी, माजी मंत्री मांगेराम राठी यांचा मुलगा यांना अटक केली. सतीश राठी, नातू गौरव आणि राहुल आणि अन्य पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जोपर्यंत पोलीस आपल्या वडिलांच्या मारेकऱ्यांना पकडत नाहीत तोपर्यंत मृतदेहाचे पोस्टमार्टम होऊ देणार नसल्याचं नफे सिंह यांच्या मुलाने म्हटलं आहे. माझ्या वडिलांच्या हत्येत स्थानिक भाजपा नेत्यांचा हात असल्याचा मला संशय आहे. पोलीस प्रशासन गप्प बसले असून मला व माझ्या कुटुंबीयांना सुरक्षा मिळत नाही. माझे वडील पाच वर्षांपासून सुरक्षेची मागणी करत होते. माझे वडील राष्ट्रीय नेते होते असं मुलाने म्हटलं आहे.
या हत्येनंतर विरोधक सरकारवर जोरदार हल्लाबोल करत आहेत. सीएम खट्टर म्हणाले की, दोषींना सोडणार नाही आणि लवकरच सर्वांना अटक केली जाईल. अभय चौटाला यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले की, त्यांच्या जीवाला धोका असूनही नफे सिंह यांना सुरक्षा देण्यात सरकार अपयशी ठरले आहे. त्यांनी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर आणि गृहमंत्री अनिल विज यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्याचवेळी काँग्रेस नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुडा यांनीही राज्य सरकारवर हल्लाबोल केला असून, या घटनेने हरियाणातील कायदा आणि सुव्यवस्था ढासळल्याचे स्पष्ट झाले असल्याचं म्हटलं आहे.