लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : केंद्रीय कामगार आयुक्त कार्यालयातील सहायक कामगार आयुक्ताला ६० हजाराची लाच घेताना सीबीआयने रंगे हात पकडले. यावेळी त्याच्या कार्यालयासह घराचीही झडती घेण्यात आली. यावेळी त्याच्या घरातून तब्बल ५२ लाख ९ हजार रुपयांची रोख रक्कम व मोठ्या प्रमाणावरील गुंतवणुकीचे दस्तावेजही सीबीआयने जप्त केले. या कारवाईमुळे कामगार आयुक्त कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांंमध्ये खळबळ उडाली आहे. सचिन शेलार (४८) असे आरोपीचे नाव आहे.
शेलार हा केंद्रीय कामगार व रोजगार मंत्रालयांतर्गत येणाऱ्या कामगार आयुक्त कार्यालयात सहायक कामगार आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. सेमिनरी हिल्स येथील सीजीओ कॉम्प्लेक्सच्या पहिल्या माळ्यावर हे कार्यालय आहे. याच इमारतीच्या तिसऱ्या माळ्यावर सीबीआयचे कार्यालय आहे. तक्रारकर्ते उद्योजक आहेत. ते एक कंपनी चालवतात. शेलार यांनी १३ डिसेंबर रोजी उद्योजकच्या फर्म आणि कंपनीची पाहणी केली. त्यांनी उद्योजकास काही दस्तावेज कार्यालयात सादर करण्यास सांगितले. त्यानुसाार १६ डिसेंबर रोजी तक्रारकर्ते उद्योजक कामगार आयुक्त कार्यालयात पोहोचले. त्यांनी शेलार यांनी सांगितलेले दस्तावेज सादर केले. यानंतरही शेलारने उद्योजकास त्यांच्या घरी येऊन भेटण्यास सांगितले. उद्योजकाने त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली तेव्हा शेलारने पैशाची मागणी केली. संबंधित फर्ममध्ये कामगार नियमांबाबत बऱ्याच अनियमितता आहेत. यामुळे त्यांच्याविरुद्ध कारवाई केली जाऊ शकते असा इशारा देत कारवाईपासून वाचायचे असेल तर लाच द्यावी लागले, असे शेलारने उद्योजकास सांगितले. शेलारने तक्रारकर्त्यास मोठ्या रकमेची मागणी केली. परंतु त्यांनी इतकी मोठी रक्कम देण्यास असमर्थता दर्शविली. तेव्हा ६० हजार रुपये मागितले. न दिल्यास त्रास वाढेल असा इशारा दिला. उद्योजकास लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी १८ डिसेंबर रोजी सीबीआय अधीक्षक निर्मला देवी यांची भेट घेतली. त्यांच्याकडे या प्रकरणाची तक्रार केली. सीबीआयने २१ डिसेंबर रोजी उद्योजकाच्या तक्रारीची आपल्यास्तरावर चौकशी केली. यात शेलारने लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. तेव्हा शेलारला रंगेहात पकडण्याची योजना आखण्यात आली. योजनेनुसार मंगळवारी त्याला कार्यालयातच ६० हजाराची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले.
या कारवाईची माहिती होताच कामगार आयुक्त कार्यालयात खळबळ उडाली. शेलार मूळचा पुण्याचा रहिवासी आहे. त्याचे कुटुंबीय पुण्यात राहतात. तो फ्रेण्ड्स कॉलनीत भाड्याने राहतो. येथे तो चार वर्षांपासून कार्यरत होता. कारवाईनंतर सीबीआयने त्याच्या घरी व कार्यालयाची झडती घेतली. त्याच्या घरी ५२.९ लाख रुपये रोख सापडले. तसेच विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर केलेले दस्तावेज जप्त करण्यात आले. शेलारला आज बुधवारी सीबीआयच्या विशेष न्यायालयासमोर सादर करून २ जानेवारीपर्यंत सीबीआय कोठडीत घेण्यात आले.
नागरिकांना तक्रार करण्याचे आवाहन
केंद्र सरकारच्या कार्यालयामध्ये कुणी लाच मागितली असेल किंवा भ्रष्टाचार होत असल्याचे लक्षात आल्यास सीबीआयकडे तक्रार करावी, असे आवाहन सीबीआयच्या अधीक्षक निर्मला देवी यांनी नागरिकांना केले आहे. सीबीआय प्रत्येक तक्रार गंभीरतेने घेईल. तक्रारदार किंवा माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल. त्यांची ओळख पटू दिली जाणार नाही. विदर्भ किंवा महाराष्ट्राच्या कुठल्याही जिल्ह्यातील नागरिक सीबीआयच्या फोन नंबर ०७१२-२५१०३८२ किंवा मोबाईल नंबर ९४२३६८३२११ यावर संपर्क करू शकतात.