मुंबई - प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या निवासस्थानासमोर काल स्फोकटांनी भरलेली स्कॉर्पिओ सापडल्याने मुंबईच्या सुरक्षा यंत्रणेमध्ये खळबळ उडालेली आहे. दरम्यान, अंबानींच्या घरासमोरील रस्त्यावर उभ्या करण्यात आलेल्या स्कॉर्पिओमधील स्फोटकांबाबत आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. (The Nagpur connection was behind the explosives found near Mukesh Ambani's house)
मुकेश अंबानींच्या मुंबईतील निवासस्थानासमोर गुरुवारी संध्याकाळी स्फोटकांनी भरलेली कार सापडली होती. दरम्यान, अंबानींच्या निवासस्थानासमोरील रस्त्यावर सापडलेली ही कार चोरीची असल्याचे निष्पन्न झाले आहे. तर या स्कॉर्पिओमध्ये सापडलेल्या जिलेटिनच्या कांड्यामागे नागपूर कनेक्शन असल्याचे दिसून आले आहे. या जिलेटिनच्या कांड्यांवर नागपूरच्या कंपनीचं नाव आहे. त्यामुळे आता नागपूरच्या कंपनीमधून ह्या जिलेटिनच्या कांड्या स्कॉर्पिओमधून अंबानींच्या निवासस्थानाजवळ कशा काय आल्या हे तपासामधून समोर येण्याची शक्यता आहे.
दरम्यान, पोलिसांनी केलेल्या अधिक तपासामध्ये ही स्कॉर्पिओ चोरीची असल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच त्यावरील नंबर प्लेट खोटी असल्याचे तपासात उघड झाहे आहे. ही स्कॉर्पिओ आठ ते दहा दिवसांपूर्वी मुंबईतील विक्रोळी परिसरातून चोरी झाली होती.
या स्कॉर्पिओमध्ये अंबानी कुटुंबीयांना धमकी देणारे एक पत्रही सापडले आहे. या पत्रात म्हटले आहे की, डियर नीता भाभी आणि मुकेश भैय्या आणि कुटुंबीय. हा केवळ ट्रेलर आहे. पुढच्या वेळी तुमच्या कुटुंबाला उडवण्यासाठीचे पूर्ण सामान येईल. सांभाळून राहा. दरम्यान, अंबानींच्या निवासस्थानासमोर स्फोटकांनी भरलेली कार कुणी ठेवली आणि त्यातील धमकीचे पत्र कुणी लिहिले होते. याबाबतची माहिती मिळू शकलेली नाही.