नागपूर : बांगलादेशी असल्याच्या संशयावरून पोलिसांनी मंगळवारी ८ तरुणांची प्रदीर्घ चौकशी केली. ते पश्चिम बंगालमधील रहिवासी असल्याचे आणि येथे रोजगारामुळे स्थिरावल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी त्यांना मोकळे केले.
पाचपावलीतील अनेक भागात सूट, शेरवानीसह विविध कपड्यांवर एम्ब्रॉयडरी करणारे कारागिर राहतात. त्यातील अनेक जण बिहार, पश्चिम बंगालमधील रहिवासी आहेत. येथे चांगला मोबदला मिळत असल्याने ते पाचपावलीतील विविध भागात भाड्याच्या खोलींमध्ये राहतात. अशातीलच काही जण बांगलादेशी असल्याच्या संशयावरून सोमवारी रात्री पाचपावली पोलिसांनी ताब्यात घेतले. ते बांगलादेशी असल्याची जोरदार चर्चा पसरल्याने एटीएसचे पथकही पाचपावली ठाण्यात पोहचले.
सर्वांच्या रूमची कसून तपासणी घेण्यात आली. त्यांच्याकडे नंदीग्राम येथील वास्तव्याची कागदपत्रे आढळली. त्या आधारे एटीएसच्या अधिका-यानी मंगळवारी दिवसभर पश्चिम बंगाल पोलिसांशी संपर्क करून या तरुणांची शहानिशा केली. ते सर्व नंदीग्रामचे रहिवासी असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे आणि येथे रोजगारामुळे स्थिरावल्याचे लक्षात आल्यानंतर रात्री उशिरा त्यांना सोडून देण्यात आले. दरम्यान, शहरात बांगलादेशी पकडल्याचे वृत्त सर्वत्र पसरल्याने खळबळ निर्माण झाली होती.