उमरेड : मागील काही दिवसांपासून भिवापूर तालुक्यातील मांडवा गावातील जात पंचायतीच्या तक्रारींचा मुद्या उजेडात आला आहे. उमरेड पोलीस ठाण्यात याप्रकरणी दहा जणांविरुद्ध गुन्हा सुद्धा दाखल झाला. स्थानिक पोलीस तपासाचे चक्र फिरवित असतानाच ‘गावमामा’ असलेल्या आणि सध्या नागपूर येथे पोलीस विभागात कार्यरत पोलीसदादाने ‘दबंगगिरी’ केल्याची तक्रार उमरेड पोलीस ठाण्यात रविवारी करण्यात आली आहे.
मधुकर भावसिंग राठोड असे या पोलीसदादाचे नाव असून जात पंचायतीने बहिष्कृत केल्याप्रकरणी विजय राठोड याने तक्रार दाखल केली होती. याप्रकरणाचा उमरेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. तपास, बयाण आणि संपूर्ण प्रकरण पोलीस निरीक्षक यशवंत सोलसे हाताळत असतानाच रविवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास नागपूर येथील पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेल्या मधूकर राठोड याने आपले गाव गाठले.
मांडवा येथे एका ठिकाणी सभा सुरू होती. दरम्यान तक्रारकर्ता विजय राठोड मुख्य मार्गाने जात असताना गावातीलच एकाने विजयला हाक मारली. अशातच तू इथे कसा आलास, जात पंचायती विरोधात तक्रार का दिली, असा सवाल उपस्थित करीत विजयला अश्लील शब्दात शिवीगाळ, धक्काबुक्की आणि जीवे मारण्याची धमकी पोलीस मधुकर राठोड याने दिली, असा आरोप विजय राठोडने तक्रारीत केला आहे. याप्रकरणी उमरेड पोलीस ठाण्यात ५०४, ५०६ कलमान्वये अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
गावात तणाव
आजच्या या प्रकारामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. दुसरीकडे जात पंचायतीच्या अन्यायकारक भुमिकेबाबत अन्य एका तरुणी आणि तिच्या आईने उपविभागीय पोलीस अधिकारी भिमराव टेढे यांच्याकडे लेखी तक्रार दिली आहे. २९ जून २०२१ रोजी देण्यात आलेल्या तक्रारीचा गुन्हा दाखल करण्यात आला नाही, असे या तक्रारीत नमूद आहे. कुटुंब भयभित असल्याचीही व्यथा तरुणी आणि तिच्या आईने मांडली आहे.
जात पंचायतीची तक्रार करणारा विजय राठोड याने नागपूर येथील पोलीसाने धमकी, शिवीगाळ, धक्काबुक्की आणि जिवानिशी ठार मारण्याची तक्रार दिली आहे. मी याप्रकरणी संबंधित ठाण्यातील अधिकाऱ्याशी बोलणार आहे.
यशवंत सोलसे, पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन उमरेड