यवतमाळ : उमरखेडच्या नायब तहसीलदारावर चाकुने हल्ला करून त्यांच्या खुनाचा प्रयत्न करणाऱ्या रेती माफिया तथा कुख्यात गुंड अविनाश चव्हाण याला अखेर नाशिक येथे अटक करण्यात आली. उमरखेड पोलीस ठाण्यातील फौजदार पांचाळ यांच्या पथकाला तब्बल दोन आठवड्यानंतर या रेती माफियाच्या मुसक्या आवळण्यात यश मिळाले आहे.
दोन आठवड्यांपूर्वी मध्यरात्री उमरखेड येथे रेतीच्या वाहनांची तपासणी करीत असताना नायब तहसीलदार वैभव पवार यांच्या पथकावर रेती माफिया अविनाश चव्हाण व साथीदारांनी चाकूहल्ला केला होता. यात पवार गंभीर जखमी झाले. त्यांना नांदेडला उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. तलाठ्यालाही इजा झाली होती. या घटनेनंतर चव्हाण याच्या आठ साथीदारांना लगेच अटक करण्यात आली. मात्र म्होरक्या चव्हाण घटनेपासून फरार होता. त्याच्या अटकेसाठी महसूल कर्मचारी संघटनांनी आंदोलन केले. अटकेसाठी १५ फेब्रुवारीचा अल्टीमेटम देण्यात आला होता. या तारखेनंतर राज्यभर तहसीलदार व नायब तहसीलदारांनी कामबंद आंदोलन पुकारण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे पोलिसांनी रेती माफिया अविनाश चव्हाणच्या अटकेसाठी जोरदार हालचाली केल्या. अखेर सोमवारी रात्री पोलिसांना अविनाश नाशिक जिल्ह्यात हाती लागला.
पोलीस उपनिरीक्षक पांचाळ यांच्या पथकाने त्याला अटक केली. अविनाशवर तब्बल ३५ गुन्हे दाखल आहेत. उमरखेड, महागाव, दिग्रस, दारव्हा एवढेच नव्हे तर यवतमाळातही त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत. गेल्या काही महिन्यांपासून तो रेती तस्करीत सक्रीय होता. उमरखेड, महागाव, माहूर, पुसद अशा विविध विभागात त्याने रेती तस्करीचे नेटवर्क उभे केले होते. त्याच्या या टोळीत अनेक क्रियाशील गुन्हेगारांचा समावेश आहे. या रेती तस्करांना सत्ताधारी पक्षाचे राजकीय अभय असल्याचे बोलले जाते.