नालासोपारा (मंगेश कराळे)- प्रवासादरम्यान लाखो रुपये किंमतीचे गहाळ झालेले सोन्याचे दागिने, दोन मोबाईल तक्रारदाराला दोन तासांमध्ये परत करण्यात नायगांवच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांना यश मिळाले आहे. तर हा किंमती मुद्देमाल परत सुखरूप मिळवून दिल्याबद्दल तक्रारदारांनी नायगावपोलिसांचे आभार मानले आहे. सदर माहिती जनसंपर्क अधिकारी विशाल धायगुडे यांनी मंगळवारी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
नायगावच्या साईधाम काँप्लेक्समध्ये राहणारे मोहन भगवान चाळके व त्यांची पत्नी नामे मनिषा मोहन चाळके हे दोघे सोमवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास नायगाव रेल्वे स्थानक असे दुचाकीने जात होते. या प्रवासादरम्यान मनिषा चाळके यांची पर्स व त्यातील ५ तोळे ३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व २ मोबाईल असा मुद्देमाल गहाळ झाले. त्यांनी नायगाव पोलीस ठाणे येथे मालमत्ता गहाळ झाल्याची तक्रार दिली. सदर गहाळ झालेल्या मालमत्तेमध्ये किंमती मुद्देमाल असल्याने सदर बाबींचे गांभीर्य लक्षात घेवुन नायगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भामे यांनी केलेले मार्गदर्शन व सूचनेप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाव्दारे माहिती मिळवली. ३ तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसुत्र, २ तोळे वजनाचे नेकलेस, ५ ग्रॅम वजनाची अंगठी असा २ लाख ७५ हजार रुपये किंमतीचा एैवज, सॅमसंग व रेडमी कंपनीचा मोबाईल किंमत ३० हजार रुपये असा एकुण ३ लाख ५ हजार रुपये किंमतीचा गहाळ झालेला मुद्देमाल दोन तासांत ताब्यात देण्यात आला आहे. सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त सुहास बावचे, सहाय्यक पोलीस आयुक्त पद्मजा बढे यांचे मार्गदर्शनाखाली नायगाव पोलीस ठाणे वरीष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भामे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) मिलींद साबळे, गुन्हे प्रकटिकरण शाखेचे सपोनि संतोष सांगवीकर, सपोनि रोशन देवरे, पोलीस अंमलदार सचिन मोहीते, सचिन खताळ, जयवंत खंडवी, अमर पवार, चेतन ठाकरे, अशोक पाटील यांनी यशस्वीरित्या कामगीरी पार पाडली आहे.