मुंबई - महिला पोलीस कर्मचारी मनिषा विसपुते यांनी कर्तव्य बजावत असताना माणुसकी दाखवत एका पोलिसाचे प्राण वाचविले आहेत. मुंबई पोलीस दलाला अभिमान वाटणारी ही घटना आज सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास घडली. पोलीस दलातील ही नवदुर्गा सध्या खेरवाडी पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. मनिषा यांनी प्रसंगावधान दाखवत तत्परतेने रस्त्यात दुचाकीवरून जाताना छातीत दुखू लागलेल्या पोलिसाला रुग्णालयात दाखल केले त्यांचा जीव वाचविला आहे.
खेरवाडी पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस कर्मचारी मनिषा विसपुते या रात्रपाळीला कर्तव्यावर असताना आज सकाळी ८. ३० वाजताच्या सुमारास घरी जाण्याच्या वेळेस पोलीस शिपाई किरण सांगळे यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांनी पोलिसांकडे दुचाकी थांबवून मदत मागितली. मनिषा या मोबाईल व्हॅन ५ वर रात्रपाळीचे काम संपवून दिवसपाळीकरिता कर्तव्यावर हजर असलेल्या पोलीस निकम यांच्यासोबत पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वांद्रे रेल्वे ब्रिज येथे ॲन्टीचैन स्नॅचिंग पाॅईंटवर होत्या. घरी जाण्याच्या तयारीत असलेल्या मनिषा यांनी काही अंतरावर अचानक दुचाकीवरुन प्रवास करणारा एक व्यक्ती अत्यावस्थ होऊन रस्त्याच्या कडेला बसल्याचे पाहून विचारपूस केली असता त्यांनी मदत मागितली. ही एक व्यक्ती होती आरे पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी निकम. त्यांनी मदत मागितल्यानंतर तात्काळ मनिषा यांनी पोलीस नियंत्रण कक्षास फोन करून आणि पोलिसांचे जनसंपर्क अधिकारी मंजुनाथ सिंगे यांची परवानगी घेतली आणि वेळ अजिबात न घालवता मनिषा यांनी पोलीस व्हॅन चालवून निकम यांनी अंधेरीतील मरोळ परिसरातील सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल केले. याबाबत मनिषा विसपुते यांनी लोकमतशी बोलताना सांगितले की, छातीत दुखत असल्याने अतिशय अत्यवस्थ अवस्थेत निकम तळमळत होते. त्यांची स्थिती मला पाहावली नाही. त्यांच्याकडे चौकशी केली असता सांगळे यांनी मी उपचारासाठी नागपाडा येथील पोईस रुग्णालयात जात असल्याचे सांगितले. तसेच निकम आरे पोलीस ठाण्यात कर्तव्यावर आहेत अशी माहित मनिषा यांनी दिली. निकम यांनी मदत मागितल्याक्षणी मी पोलीस व्हॅन इतरत्र हलविण्यासाठी लागणाऱ्या परवानगी घेत माझे सहकारी निकम यांच्या मदतीने गाडी इतक्या ट्राफिकमधून देखील वेगाने चालवून १५ मिनिटात सेव्हन हिल्स रुग्णालयात नेली आणि सांगळे यांना दाखल केलं. नंतर सांगळे यांच्या पत्नीला फोन करून याबाबत माहिती दिली असे पुढे मनिषा यांनी सांगितले. वेळीस वैद्यकीय उपचार मिळाल्याने संकट टाळल्यामुळे पोलीस दलात मनिषा यांचे कौतुक होत आहे.