माथेरान : येथील इंदिरानगरमध्ये झालेल्या निर्घृण हत्येचा उलघडा अवघ्या २४ तासांच्या आत लावण्यात माथेरानपोलिसांना यश आले आहे. या घटनेतील मारेकरी महिलेचा पतीच असल्याचे उघड झाले.इंदिरानगरमधील एका लॉजमध्ये एका स्त्रीचा नग्नावस्थेत शिर नसलेला मृतदेह आढळून आला होता. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती. ज्या पद्धतीने ही हत्या झाली होती. त्यामुळे जिल्ह्यातील संपूर्ण पोलीस यंत्रणा देखील अलर्ट झाली होती. यावेळी पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी तत्काळ माथेरान गाठून तपासाची सूत्रे हाती घेतली. खुनाचा तपास करताना पोलिसांना खोल दरीत एक रक्ताचे डाग असलेली लेडीज पर्स आढळून आली होती. या पर्समुळेच हत्येचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले. या पर्समधील एका चिठ्ठीतील मजकुरात दादर येथील काही मजकूर होता. त्याचा आधार घेत माथेरान पोलिसांनी गोरेगाव, मुंबई येथे एक महिला बेपत्ता असल्याची नोंद सापडली होती. विशेष म्हणजे आरोपी हाच पत्नी गायब असल्याची तक्रार नोंदविण्यास आला होता.त्यानंतर माथेरान पोलिसांनी त्याचे छायाचित्र व माथेरानमधील सीसीटीव्ही फुटेज तपासणी करत दोन्ही व्यक्ती एकच असल्याचे दिसून आले. पोलिसांनी रात्री उशिरा आरोपीला माथेरानमध्ये आणल्याचे पोलिसांनी सांगितले.खोल दरीमध्ये टाकले महिलेचे शिरआरोपी राजीव पाल याने आपली पत्नी पूनम पालची हत्या केल्याचे कबूल केले. तसेच तिचे शिर, कपडे व खुनासाठी वापरलेले हत्यार जवळील खोल दरीत टाकल्याचे कबूल केले. त्यानुसार तपास केला असता खोल दरीमध्ये महिलेचे शिर आढळून आले असून, बाकीच्या वस्तूंचा शोध पोलीस उशिरापर्यंत घेण्यात येत आहे.संशयावरूनच हत्येचा प्राथमिक अंदाजपत्नीचा खून करणारा राजीव पाल हा उच्चशिक्षित तरुण असून पनवेल येथे राहत होता, तर त्याची मृत पत्नी पूनम ही परिचारिकेचे शिक्षण घेत होती. गोरेगाव मुंबई येथे राहणाऱ्या पूनमचे मे महिन्यात लग्न झाले होते; पण दोघांचे संबंध ठीक नसल्याचे तिच्या नातेवाइकांचे म्हणणे होते. आरोपीने संशयावरूनच ही हत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे.