मुंबई - नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणात मुलगा गणेश कपाळे याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याचा जबर धक्का बसल्याने मधुकर बाबूराव कपाळे यांचे हृदयविकाराने निधन झाले. त्यांचे वय ६८ होते. नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणातएटीएसने जालना येथून श्रीकांत पांगारकर याला ताब्यात घेतले होते. पांगारकरने गणेश कपाळे याच्या दुकानातून काही मजकूराचे डीटीपी काम करून घेतले होते. केवळ याच संशयावरून एटीएसने गणेशला ताब्यात घेतले आणि चौकशीसाठी संभाजीनगर येथे नेले. गणेशला ताब्यात घेतल्याचे कळताच त्याच्या वडिलांना धक्का बसला. अतिशय चिंताजनक अवस्थेत गुरुवारी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, दुर्दैवाने आज सकाळी उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमधून ते सेवानिवृत्त झाले होते. त्यामुळे मधुकर कपाळे यांच्या मृत्यूला एटीएस जबाबदार असल्याची चर्चेला उधाण आले आहे.
फक्त अटक आरोपी श्रीकांत पांगारकरने काही डीटीपीचे काम करून घेतले म्हणून त्याच्यावर संशय ठेवत एटीएसने गणेश कपाळे याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. मात्र, त्याच्या चौकशीत एटीएसच्या हाती काहीच लागले असून बुधवारी सकाळी गणेशला ताब्यात घेतले आणि सायंकाळी सोडून दिले. परंतु एटीएसच्या या कारवाईचा गणेशच्या वडिलांवर मोठा परिणाम झाला आणि त्यांना हार्ट अटॅक आला.