ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटूसुशील कुमारला ज्युनियरकुस्तीपटू सागर धनखडच्या हत्येच्या आरोपात अटक केली आहे. सुशीलच्या अटकेनंतर या प्रकरणात अनेक महत्वाचे खुलासे होत आहेत.तसेच सुशीलच्या विरोधात पुरावे गोळा करण्यासाठी पोलिसांनी हरियाणा, पंजाबसह अनेक ठिकाणी धाडी देखील टाकल्या आहेत. या संपूर्ण पोलीस तपासातून सुशील कुमारला मदत करणाऱ्या व्यक्तींमध्ये एका महिला खेळाडूचे नाव समोर आल्याने खळबळ माजली आहे.
दिल्ली पोलिसांनी या प्रकरणात रविवारी एक स्कुटी जप्त केली आहे. ही स्कुटी पश्चिम दिल्लीमध्ये राहणाऱ्या एका महिला खेळाडूची असल्याचे तपासात उघड झाले आहे. सुशील कुमार आणि अजय कुमार हे शनिवारी रात्री या महिला खेळाडूच्या घरी थांबले होते. त्यानंतर ते स्कुटीने दुसरीकडे जाणार होते. ही महिला हँडबॉल खेळाडू असून तिने दोन वेळा एशियन गेम्समध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आता या महिलेची चौकशी होणार असून या चौकशीत नवे महत्वाचे खुलासे होण्याची शक्यता आहे.
सुशील कुमार आणि सागर धनखड यांच्यात पैशाच्या व्यवहारावरून वाद होते अशी माहिती उघडकीस आली आहे. या मारहाणीनंतर सुशील कुमार दोन आठवडे फरार होता. त्याच्यावर पोलिसांनी १ लाखाच्या बक्षीसाची घोषणाही केली होती. सुशील कुमारने या प्रकरणी अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात धावही घेतली. मात्र, त्याला अटकपूर्व जामीन मिळाला नाही. सुशील कुमारवर भादंवि कलम ३०२, ३६५, १२० - ब अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
डोक्यावर बोथट वस्तूने वार
जहांगीरपुरी येथील बीजेआरएमएच रुग्णालयाचे डॉ. मुनीष वाधवन यांच्या अहवालानुसार तपासणीसाठी व्हिसेरा आणि रक्ताचे नमुने सील करण्यात आले आहेत. डोक्यावर बोथट वस्तूने वार केल्यामुळे सागरचा मृत्यू झाला आहे. डॉक्टरांच्या मते शरीरावर आढळलेल्या सर्व खुणा मृत्यूच्या अगोदरच्या आहेत.
रेल्वे केले निलंबित
कुस्तीपटू सागर धनखड खून प्रकरणातील आरोपी ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटूसुशील कुमार याला पुढील आदेश येईपर्यंत रेल्वेने वरिष्ठ कमर्शियल मॅनेजर पदावरून निलंबित केले आहे. सुशीलचे निलंबन २३ मे पासून लागू करण्यात आले असून पुढील आदेश येईपर्यंत तो निलंबित राहील. सुशीलला कुस्तीपटू सागर धनखड याच्या हत्येच्या आरोपात २ दिवसांपूर्वी दिल्ली पोलिसांनी अटक केली होती. हत्येच्या आरोपावरून सुशील कुमारविरोधात चौकशी सुरू झाल्यानंतरच रेल्वेने हे पाऊल उचलले आहे.