मुंबई - वृद्ध शेजारी लहानपणापासून ओरडतो म्हणून त्याला धडा शिकवण्यासाठी 140 बोगस ई-मेल आयडी बनवून मराठीतील प्रसिद्ध वृत्तपत्राच्या संकेतस्थळावर समाजात तेढ निर्माण करणारे तसेच अश्लील असे संदेश पोस्ट करणाऱ्या तरुणाला आझाद मैदान पोलिसांनीअटक केली आहे. नाहूरमध्ये राहणारा सिद्धेश खापरे (31) असं या आरोपीचं नाव आहे.
जानेवारी 2018 पासून हा प्रकार सुरू होता. आयपी ऍड्रेसच्या सहाय्याने पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत. मराठीतील प्रसिद्ध वृत्तपत्राच्या ऑनलाईन आवृत्तीचे संपादक या प्रकरणातील तक्रारदार आहेत. वर्षभरापासून आरोपी वृत्तपत्राच्या संकेतस्थळावर वाचकांच्या प्रतिक्रियांमध्ये आक्षेपार्ह लिखाण करत असल्याचे उघडकीस आले. खापरेने तक्रारदारांच्या नावाने बनावट ई-मेल आयडी तयार करून तसेच फेसबुकवरील त्यांच्या छायाचित्राचा वापर करून लिखाण करत असल्याचेही समोर आलं. दाखल तक्रारीनुसार, आझाद मैदान पोलिसांनी खापरेविरोधात भा.दं.वि. कलम 419 (तोतयागिरी), 295(अ)(धार्मिक तेढ निर्माण करणे), 500 (बदनामी करणे), 507 (तंत्रज्ञानाचा गुन्ह्यात वापर), 34 (सामूहिक हेतू) व तंत्रज्ञान गैरवापर प्रतिबंधक कायद्याच्या कलम 66 क आणि ड अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
खापरेच्या इमारतीत राहणारे 71 वर्षीय वृद्ध व्यक्ती त्याला लहानपणापासून ओरडत असत. त्याचा बदला घेण्यासाठी खापरेने या वृत्तपत्राच्या संकेतस्थळावर त्या व्यक्तीच्या नावाने आक्षेपार्ह लिखाणास सुरुवात केली. खापरेने धार्मिक, जातीय तेढ निर्माण होईल, असे लिखाणही केले होते. एका राजकीय पक्षाच्या विरोधातही या संकेतस्थळावर आक्षेपार्ह पोस्ट केली होती.