सदानंद नाईक, उल्हासनगर : ननावरे दाम्पत्य आत्महत्या प्रकरणी आमदार बालाजी किणीकर यांच्या पीएसह चौघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने अटक करून त्यांची रवानगी आधारवाडी जेल मध्ये केली. तब्बल २८ दिवसांनंतर आमदार किणीकर यांच्या पीए शशिकांत साठे व्यतिरिक ३ जणांना जामीन झाला आहे.
उल्हासनगरचे माजी आमदार पप्पु कलानी व ज्योती कलानी यांचे स्वीयसहायक म्हणून काम केलेले नंदू ननावरे हे शिवसेना शिंदे गटाचे आमदार बालाजी किणीकर व माजी आमदार पप्पु कलानी यांचे मंत्रालयातील काम पाहत होते. दरम्यान सातारा फलटणचे संग्राम निकाळजे यांच्यासह रणजितसिंग नाईक निंबाळकर व देशमुख वकील बंधू यांच्या छळाला कंटाळून आम्ही आत्महत्या करीत आहोत. असा व्हिडीओ सोशल मीडियावर ननावरे दाम्पत्यांनी व्हायरल करून १ ऑगस्ट रोजी राहत्या घराच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. ननावरेचा व्हायरल व्हिडीओवरून विठ्ठलवाडी पोलिसांनी रणजितसिंग नाईक निंबाळकर, संग्राम निकाळजे, देशमुख बंधू या चौघावर गुन्हा दाखल केला.
दरम्यान विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याकडील ननावरे तपास ठाणे क्राईम ब्रँचकडे वर्ग करण्यात आला. ननावरे दाम्पत्यांनी ज्यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. त्यांच्यावर कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ ननावरे यांचे बंधू धनंजय ननावरे यांनी स्वतःच्या हाताचे बोट कापण्याचा व्हिडिओ १८ ऑगस्ट रोजी व्हायरल करून कापलेले बोट गृहमंत्री फडणवीस यांना देणार असल्याचा इशारा दिला. त्यानंतर तपास जलदगतीने फिरून आमदार बालाजी किणीकर यांचे स्वीयसहायक शशिकांत साठे, पप्पु कलानीचे कट्टर समर्थक कमलेश निकम, नरेश गायकवाड व शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी गणपती कांबळे यांना सापडलेल्या चिट्टीत नाव असल्याचे कारण देत अटक केली होती. तर मुख्य आरोपींनी अटकपूर्व जामीन घेतला आहे.
राजकीय दबावाला बळी- निकम
एका भाजप नेत्या विरोधात केलेले वक्तव्याच्या रागातून माझ्यावर कारवाई होऊन, कलानी कुटुंब सोडण्यासाठी दबाव आला. मात्र कलानी कुटुंबाला जीवातजीव असे पर्यंत सोडणार नसल्याचे कमलेश निकम यांनी म्हटले आहे.