सदानंद नाईक
उल्हासनगर : ननावरे दाम्पत्यांच्या आत्महत्या प्रकरणी शिवसेना शिंदे गटाचे आमदार बालाजी किणीकर यांचे स्वीय सहायक शशिकांत साठे यांच्यासह माजी आमदार पप्पु कलानी यांचे कट्टर समर्थक कमलेश निकम, नरेश गायकवार व शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी गणपती कांबळे यांना खंडणी विरोधी पथकाने अटक करून चौकशी सुरू केली. दरम्यान आमदार किणीकर यांच्या पेक्षा त्यांच्या पीएचीच चर्चा शहरात रंगली असून आत्महत्या केलेले ननावरे हे माजी आमदार ज्योती कलानी यांचे स्वीयसहायक राहिले आहे.
उल्हासनगरच्या माजी आमदार ज्योती कलानी यांचे स्वीयसहायक म्हणून काम केलेले नंदू ननावरे यांनी यापूर्वी अनेक आमदारांचे स्वीयसहायक म्हणून काम केले. तसेच ज्योती कलानी यांच्या मृत्यूनंतर माजी आमदार पप्पु कलानी व शिवसेना शिंदे गटाचे आमदार बालाजी किणीकर यांचे मंत्रालय स्तरावरील काम ननावरे हे करीत होते. असे बोलले जाते. तसेच ननावरे यांचे अनेक आमदारांसोबत चांगले संबंध होते. मात्र कोणत्या कारणावरून त्यांना अनेकांनी त्रास दिला. ज्यामुळे ननावरे दाम्पत्यांनी आत्महत्या सारखे पाऊल उचलले. याचे कोडे पोलिसांसह नागरिकांना पडले आहे.
माजी आमदार ज्योती कलानी व चार वेळा आमदार राहिलेले पप्पु कलानी यांच्या पेक्षा त्यांचे पीए म्हणून राहिलेले नंदू ननावरे हेच चर्चेत राहिले. तसेच त्यांच्या आत्महत्या प्रकरणी अटक झालेले शिवसेना शिंदे गटाचे आमदार बालाजी किणीकर यांचे स्वीयसहायक शशिकांत साठे यांची चर्चाही शहरात होत आहे. मंत्री, खासदार व आमदार यांच्या पेक्षा त्यांचे पीएचीच चर्चा आजकाल होत असल्याने, कुछ तो गोलमाल है, असे म्हणण्याची वेळ नागरिकांवर आलीं आहे. ननावरे दाम्पत्यांनी आत्महत्या पूर्वी काढलेल्या व्हिडीओ मध्ये फक्त चौघांची नावे घेतली. तर मिळालेल्या चिट्टीत आमदार किणीकर यांचे स्वीयसहायक साठे, कलानीचे कट्टर समर्थक निकम, नरेश गायकवाड व शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी गणपती कांबळे यांना ठाणे खंडणी विरोधी पथकाने अटक करून चौकशी सुरू केली आहे.
मोठे मासे निसटणार?
ननावरे दाम्पत्यांच्या व्हायरल व्हिडीओत रणजितसिंह नाईक निंबाळकर, संग्राम निकाळजे व वकील असलेल्या देशमुख बंधू यांचे नाव घेतले. मात्र व्हिडीओ व एफआरआय मधील गुन्हेगारांना अटक करण्या ऐवजी चिट्टीत नमूद केलेल्या नावावरून आमदार किणीकर यांच्या पीएसह अन्य चार जणांना अटक करून तपास सुरू केला.