नांदेड - अफजलखान वधाच्या वेळी शिवरायावर सय्यद बंडाने दांडपट्टयाने वार केला असता त्यांचा अंगरक्षक असलेल्या जिवाजी महालाने समशेरीच्या एका वारात सय्यद बंडाचा हात दंडापासून वेगळा करून शिवरायांचा जीव वाचविला. तेव्हापासून होता जीवा म्हणून वाचला शिवा अशी म्हण प्रचलित आहे. नांदेडात धुळवडीच्या दिवशी तसाच काहीसा प्रत्यय आला. पोलिस अधीक्षकांच्या दिशेने फेकलेला भाला त्यांचा अंगरक्षक असलेल्या दिनेश पांडे यांनी आपल्या पाठीवर घेत त्यांचे प्राण वाचविले.
दरवर्षी धुळवडीच्या दिवशी नांदेडातील सचखंड गुरुद्वारा येथून हल्ला बोल मिरवणूक काढण्यात येते. परंतु यंदा लॉकडाऊनमुळे प्रशासनाने मिरवणुकीला परवानगी नाकारली होती. परंतु त्यानंतरही २९ मार्च राेजी सायंकाळी गुरुद्वारात अरदास झाल्यानंतर बॅरीकेट तोडून मिरवणूक मुख्य रस्त्यावर आली. यावेळी हातात उघडी शस्त्रे घेवून चारशे ते पाचशे तरुणांचा जत्था पोलिसांच्या दिशेने धावत होता. दिसेल त्या पोलिस कर्मचाऱ्यांवर हातातील शस्त्राने वार करण्यात येत होते.
त्याचवेळी प्रवेशद्वार क्रमांक एकवर पोलिस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे त्यांचा अंगरक्षक दिनेश रामेश्वर पांडे आणि पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर हे थांबून होते. त्याचवेळी पोलिस अधीक्षक शेवाळे आणि चिखलीकर हे जमावापासून बाजूला होत असताना अंगरक्षक पांडे हे दोन्ही त्यांना जमावापासून वाचविण्याचा प्रयत्न करीत त्यांना कव्हर करीत होतो. तोच जमावातील एकाने पोलिस अधीक्षकांच्या दिशेने भाला फेकला. क्षणातच तो भाला पांडे यांच्या पाठीत घुसला. मोठ्या पात्याचा भाला पांडे यांच्या बरगडीपर्यंत पोहचला होता. रक्तबंबाळ होत पांडे जमीनीवर कोसळले. लगेच सहकारी पोलिसांनी त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल केले. या ठिकाणी त्यांच्या पाठीवर तब्बल पन्नास टाके मारण्यात आले. आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिस अधीक्षकांनी सांगितले.
कर्तव्य निष्ठेचे बाळकडू वडीलांकडूनदिनेश पांडे यांचे वडील रामेश्वर पांडे हे पोलिस दलातून पोलिस उपनिरिक्षक या पदावरुन सेवानिवृत्त झाले. त्यामुळे लहानपणापासूनच त्यांना खाकीचे आकर्षण होते. वयात आल्यानंतर त्यांनीही अंगावर खाकीच चढविली. सध्या ते पोलिस दलात नाईक या पदावर कार्यरत होते. त्यांच्या कर्तव्य निष्ठेमुळेच पोलिस अधीक्षकांनी त्यांची अंगरक्षक म्हणून नेमणुक केली होती.