नांदेड : विविध प्रकरणांच्या तपासात नांदेडपोलिसांनी दोन पिस्तुल आणि एक गावठी कट्टा पकडला असून यातील एका पिस्तुलाने नांदेडातील काँग्रेस कार्यकर्ते तथा गोल्डमॅन म्हणून ओळख असलेल्या गोविंद कोकुलवार यांच्यावर गोळी झाडल्याचेही पुढे आले आहे़
याबाबत पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी सांगितले, स्थानिक गुन्हा शाखा आणि खंडणी विरोधी पथकाने जिल्ह्यातील गुन्हेगारांचा शोध सुरू केला आहे़ या तपासात हदगाव तालुक्यातील अंबाळा येथे बजरंग उर्फ योद्धा भीमराव नरवाडे याच्याकडून एक गावठी कट्टा जप्त करण्यात आला आहे़ त्याची चौकशी केली असता अन्य एका कुख्यात गुन्हेगाराचे नाव पुढे आले असून सुभाष पवार याच्यासोबत योद्धा नरवाडे या दोघांनी नांदेड जिल्ह्यासह इतर भागातही गंभीर गुन्हे केल्याचेही स्पष्ट झाले आहे़
कटाचा झाला उलगडा
याच दोघाकडून नांदेडमधील अबचलनगर येथील गुरुचरणसिंघ उर्फ लकी, सपुरणसिंघ गील व त्याचा साथीदार गुड्डू उर्फ सय्यद नजीरोद्दीन मुनीरोद्दीन (रा़ आसरानगर, देगलूरनाका) या दोघांनी काँग्रेस कार्यकर्ते गोविंद कोकुलवार यांचा खून करण्याचा कट रचला होता़ याच कटांतर्गत १७ आॅगस्ट रोजी कोकुलवार यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या़ या गुन्ह्यातील पिस्तुल हदगाव तालुक्यातील बरडशेवाळा येथील सुभाष मोहन पवार याने पुरवले होते़ पवार याच्याविरूद्ध हदगाव पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल असून तो पोलिस कोठडीत आहे़ कोकुलवार यांच्या खूनाच्या कटाचे कारण मात्र पोलिसांनी स्पष्ट केले नाही़
याच गुन्ह्याच्या तपासात लातूरमधील स्वराजनगर, बार्शी रोड येथे विठ्ठल महादेव कुरणे हा गावठी कट्टयाची तस्करी व विक्री करीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले़ त्याने डिसेंबर २०१८ मध्ये दोन गावठी कट्टे पुण्यातून विक्रीसाठी आणले होते़ त्यातील एक पिस्तुल हे मुखेड येथून जप्त करण्यात आले असल्याचेही पोलिस अधीक्षक मगर यांनी सांगितले़