एक मित्र, ज्याला त्याच्या मैत्रिणीला वाढदिवसाच्या दिवशी सरप्राईज गिफ्ट द्यायचं होतं. पण हे गिफ्ट घेताना मैत्रिणीचे डोळे बंद हवेत अशी त्याची अट होती. त्यामुळे डोळ्यांवर पट्टी आणि हातपायांमध्ये बेड्या बांधून मुलगी तिच्या सरप्राईज गिफ्टसाठी तयार झाली. पण यानंतर जे काही झाले. ते ऐकून सगळ्यांनाच धक्का बसला. रविवार २४ डिसेंबरची ही घटना आहे. नंदनी खूप खुश होती. बर्थ डेच्या एक दिवसाआधी तिने खास मित्र वेट्रीमारनला फोन केला. चेन्नईत राहणारे नंदनी आणि वेट्रीमारन दोघेही लहानपणापासून एकमेकांना ओळखत होते.
२७ वर्षीय नंदनी सॉफ्टवेअर इंजिनिअर होती तर वेट्रीमारन एका आयटी कंपनीत काम करत होता. शाळेत एकत्र शिक्षण घेतल्यानंतर कॉलेजमध्ये ते वेगवेगळे झाले. मात्र दोघांनी एकमेकांसोबत संपर्क तोडला नाही. परंतु अलीकडेच काही दिवसांपासून दोघांमध्ये वाद सुरू होते. वेट्रीमारन सतत नंदनीसोबत भांडण करत होता. दोघांच्या नात्यात कटुता आली. तरीही बर्थ डे च्या एक दिवस आधी नंदनीने वेट्रीमारनला फोन केला. तेव्हा वेट्रीमारननेही तिला सरप्राईज देण्याचं वचन दिले. नंदनी वेट्रीमारनला भेटण्यासाठी उत्सुक होती. वेट्रीमारन तिच्या घरी आला त्यानंतर दोघेही एकत्र फिरायला गेले.चेन्नईमध्ये फिरता फिरता त्यांनी शॉपिंग केली, कपडे खरेदी केले. नंदनीच्या बर्थ डेच्या आधी अनाथाश्रमात जाऊन लहान मुलांना गिफ्ट दिले आणि त्यानंतर दोघे मंदिरात गेले.
आता सरप्राईज गिफ्ट देण्याची वेट्रीमारनची वेळ आली होती. संध्याकाळी ७.१५ वाजले होते. वेट्रीमारननं नंदनीला भेटवस्तू देण्यासाठी चेन्नईतील पोनमार रोडच्या एका निर्जन भागात नेले. दाट अंधार पडला होता. तिच्या बालपणीच्या मित्राकडून तिला सरप्राईज मिळणार असल्यानं नंदनीला त्यात काही विचित्र वाटलं नाही. त्यानंतर पोनमार रोडवरील रिकाम्या प्लॉटवर पोहोचल्यानंतर वेट्रीमारननं नंदनीच्या डोळ्यावर पट्टी बांधली आणि जोपर्यंत तो तिला काही बोलत नाही तोवर पट्टी काढू नको असं सांगितले. वेट्रीमारननं तिचे दोन्ही हात पाय बांधले. नंदनीने त्याला विरोधही केला नाही. कारण तिचा बेस्ट फ्रेंड सरप्राईज देणार होता. परंतु वेट्रीमारननं केलेल्या कृत्यानं सगळ्यांचा थरकाप उडाला.
वेट्रीमारननं हातात लपवलेली पेट्रोल बॉटलमधून नंदनीच्या अंगावर पेट्रोल टाकलं. नंदनीला काही कळण्याच्या आतच त्याने आग लावली आणि नंदनी आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. पेट्रोलच्या आगीत नंदनी जळत होती. किंचाळत होती. परंतु वेट्रीमारन तिथून फरार झाला. रस्त्यावरून जाणाऱ्यांनी नंदनीला पाहिले आणि तात्काळ आग विझवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलीस, रुग्णवाहिका घटनास्थळी आली. मृतावस्थेत असताना नंदनीने अखेरचा वेट्रीमारनचा नंबर पोलिसांना दिला. पोलिसांना काहीच माहिती नव्हते. त्यांनी वेट्रीमारनला कॉल केला आणि घटनेची माहिती दिली. मात्र पोलीस त्याला जास्त काही विचारेल त्याआधीच तो पळून गेला. पोलिसांना वेट्रीमारनच्या हालचालींवर संशय आला. त्यानंतर पोलिसांनी त्याला पकडले तेव्हा त्याने गुन्हा कबुल केला. वेट्रीमारन नंदनीवर प्रेम करायचा परंतु ती दुसऱ्या मुलासोबत बोलायची त्यावरून वेट्रीमारनला राग होता. त्यातून त्याने हे कृत्य केल्याचे बोलले जात आहे. सध्या पोलीस सर्व अँगलने या घटनेचा तपास करत आहे.
वेट्रीमारन होता ट्रान्सजेंडरवेट्रीमारन हा ट्रान्सजेंडर होता. परंतु नंदनी आणि त्याच्या शाळेतले मित्र यांना काही कल्पना नव्हती. शाळा पूर्ण झाल्यावर वेट्रीमारनने हे सत्य नंदनी आणि इतर मित्रांना सांगितले. तेव्हा बाकीच्या मित्रांनी त्याला दूर केले परंतु नंदनीने मैत्री कायम ठेवली. काही वर्षांनी वेट्रीमारन बंगळुरू राहून सेक्स चेंज ऑपरेशन केले. तो पूर्णपणे मुलगा झाला होता. चेन्नईत तो नोकरीला होता. नव्या ओळखीसह तो नंदनीला भेटला. परंतु त्यानंतर हळूहळू तो नंदनीवर एकतर्फी प्रेम करू लागला. परंतु नंदनी इतर कुठल्या मुलासोबत बोलली किंवा भेटली तरी त्याला राग यायचा.