मुंबई - राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना रत्नागिरी पोलिसांनीअटक केली आहे. त्यानंतर राणे यांचे वकील अनिकेत निकम यांनी ही अटक बेकायदेशीर असून त्याविरोधात योग्य ठिकाणी दाद मागू असे सांगितले आहे.
नारायण राणे यांच्याविरोधात दाखल गुन्ह्यात जे कलम लावण्यात आले आहेत. त्यात ७ वर्षापेक्षा कमी शिक्षेची तरतूद आहे. त्यामुळे ७ वर्षापेक्षा कमी शिक्षा असेल तर थेट अटक करण्याचा पोलिसांना अधिकार नाही. त्यामुळे नारायण राणे यांना केलेली अटक बेकायदेशीर आहे. त्यामुळे या अटकेविरोधात आम्ही योग्य त्या वेळी योग्य ठिकाणी दादा मागू अशी माहिती नारायण राणेंचे वकील अनिकेत निकम यांनी पुढे सांगितले आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायनिवाड्यांच्या माध्यमातून वारंवार सांगितलेले आहे की एकाद्या गुन्ह्यात ७ वर्षांपेक्षा कमी शिक्षेची तरतूद असेल तर भादंवि कलम ४१ (अ) अन्वये नोटीस बजावून नंतर कारवाई करणं क्रमप्राप्त आहे. मात्र, थेट अटक करण्याचा अधिकार नाही.त्यामुळे नारायण राणेंची अटक बेकायदेशीर असल्याचं वकील अनिकेत निकम यांनी म्हटले आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने देखील तातडीने सुनावणी घेण्यास दिला नकार
अटकपूर्व जामीनासाठी नारायण राणे यांनी रत्नागिरी न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्जाची याचिका दाखल केली होती. पण न्यायालायने जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर तातडीनं याबाबत मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी घेण्यासाठीही राणेंच्या वकिलांनी प्रयत्न केले. पण मुंबई उच्च न्यायालयानंही याप्रकरणावर तातडीनं सुनावणी देण्यास नकार दिला आहे.