मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा.शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली. दिवाळीतही त्यांना अशा स्वरूपाच्या धमकीचे जवळपास १०० फोन आले होते. याप्रकरणी गावदेवी पोलिसांनी गुन्हा नोंदवत बिहारमधील नारायण सोनी याला ताब्यात घेतले आहे.
शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानाच्या दूरध्वनीवर फोनवर ही धमकी दिली. पोलिसांनी सुरक्षेत वाढ केली आहे. २ डिसेंबरला पवार यांचे सचिव सतीश राऊत यांनी पोलिस आयुक्तांना पत्र लिहून नारायण सोनी नावाचा व्यक्ती वारंवार फोन करून त्रास देत असल्याची तक्रार केली होती.
नारायण सोनीला आज (१४ डिसेंबर) कोर्टात हजर केलं जाणार आहे. याप्रकरणी पोलिसांनी IPC च्या कलम 294, 506 (2) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नारायण सोनी हा मनोरुग्ण आहे. नारायण सोनी हा १० वर्ष पुण्यात राहिला. त्याच्यासोबत त्याची पत्नीही होती. मात्र दोघांचं बिनसल्याने दोघेही वेगळे झाले. पत्नीने नारायण सोनीला सोडून दुसऱ्या व्यक्तीशी लग्न केले. शरद पवारांनी पती-पत्नीच्या भांडणाप्रकरणात काहीही कारवाई केली नसल्याचा राग नारायण सोनीच्या मनात होता. त्यातूनच त्याने शरद पवारांना धमकी दिल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"