धावत्या ट्रेनमध्ये चढणं एका दिव्यांग व्यक्तीला महागात पडलं असतं. मात्र, नशीब बलवत्तर ठरलं आणि त्याचे प्राण वाचले. अशीच काहीशी घटना पनवेलरेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर घडली आहे. एका दिव्यांग व्यक्तीचे प्राण वाचवतानाची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.
पनवेलहून रोहा याठिकाणी जाणाऱ्या धावत्या ट्रेनमध्ये एक दिव्यांग व्यक्ती चढण्याचा प्रयत्न करत होती. धीम्या गतीने चालणाऱ्या ट्रेनमध्ये चढताना त्या व्यक्तीचं संतुलन बिघडले. त्यामुळे ती व्यक्ती ट्रेनबरोबर फरफटत जाऊ लागली. त्याठिकाणी तैनात असलेल्या आरपीएफ जवानाने प्रसंगावधान राखून त्यांना प्लॅटफॉर्मवर खेचले आणि त्यांचा जीव वाचवला. हरेश महल्ले असं आरपीएफ जवानाचे नाव असून त्यांच्या कर्तव्यदक्षतेमुळे एका दिव्यांग व्यक्तीचा जीव वाचला आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
ही घटना ५ फेब्रुवारी रोजी घडली. त्यावेळी उपनिरिक्षक रेणू पटेल पनवेल स्टेशनवर प्लॅटफॉर्म क्रमांक ५ ते ७ दरम्यान गस्त घालत होत्या आणि हरेश हे प्लॅटफॉर्म क्रमांक ७ वर रोह्याकडे जाणाऱ्या दिशेला होते. रेणू पटेल यांच्या लक्षात आले ही दिव्यांग व्यक्ती चढत्या गाडीत चढण्याचा प्रयत्न करत आहे, त्यांनी लहेचच हरेश यांना याबाबत सूचना केली आणि त्यांना त्यांची मदत करता आली. ज्या व्यक्तीचे प्राण वाचवण्यात आरपीएफ अधिकाऱ्यांना यश आले, त्या व्यक्तीचं नाव प्रल्हाद पाटील असून ते रोहा याठिकाणी राहतात. ते या घटनेमध्ये सुखरुप असून कोणतीही जखम झालेली नाही.