नामदेव भोर, लोकमत न्यूज नेटवर्क, नाशिक : जिल्ह्यातील एका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये संचालकपदी निवडून आल्यानंतरही त्यांच्या निवडीविरोधात दाखल झालेल्या प्रकरणात सुनावणी घेऊन तक्रारदार यांच्या बाजूने निर्णय देण्यासाठी ३० लाख रुपयांच्या लाचेची मागणी करीत लाचेची रक्कम स्वीकारताना जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक युनिटने त्यांच्या राहत्या घरातून रंगेहात पकडले आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक युनिटच्या पथकाने जिल्हा उपनिबंधक सतीश खरे (४०, रा. आई हाईट्स, कॉलेज रोड) यांच्यासह ॲड. शैलेश सुमातीलाल सभद्रा (३२, रा. रा. उर्वी अपार्टमेंट सौभाग्य नगर, गंगापूर रोड) यांना ३० लाख रुपयांची मागणी करून सतीश खरे यांना त्यांच्या कॉलेज रोड येथील निवासस्थानी लाचेची रक्कम स्वीकारताना एसीबीने रंगेहात पकडले आहे.
नाशिक परिक्षेत्र लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अप्पर पोलिस अधीक्षक नारायण न्याहाळदे व पोलिस उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्या नेतृत्वातील सहायक उपनिरीक्षक सुकदेव मुरकुटे, पोलिस नाईक मनोज पाटील, अजय गरुड यांच्या पथकाने ही कारवाई केली असून, सोमवारी (दि.१५) उशिरापर्यंत या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.