नाशिक - गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकजवळ एका दुचाकीस्वाराला अज्ञात वाहनाने धडक दिली होती. या धडकेत दुचाकीचालक अशोक सुरेश भालेराव (४६,रा.भगूर) याचा मृत्यू झाला होता. या अपघाताच्या गुन्ह्याचा सखोल तपास मुंबईनाका पोलिसांनी केला असून भालेराव यांचा अपघात हा खून असल्याचे उघडकीस आणले आहे. याप्रकरणी सहा संशयितांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. यामध्ये एका महिलेचाही समावेश आहे.
मुंबईनाका पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की २ सप्टेंबर २०२१साली इंदिरानगर जॉगींग ट्रॅकजवळ मध्यरात्री साडेतीन वाजेच्या सुमारास भालेराव यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध ‘हिट ॲण्ड रन’चा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यात वाहनचालकाचा शोध लागत नसल्याने गुन्हा पोलिसांनी कायम तपासावर ठेवला होता. दरम्यान, मयत भालेराव यांचा भाऊ फिर्यादी दिपक भालेराव यांनी पोलिसांकडे धाव घेत अपघाताबाबत शंका व्यक्त करत घातपाताचा संशय व्यक्त केला हाेता. यामुळे पोलिसांनी पुन्हा नव्याने तपासाला गती दिली. वरिष्ठ पोलीस निरिक्षक सुनील रोहकले, पोलीस निरिक्षक चंक्रकांत अहिरे, सहायक निरिक्षक किरण रौंदळे, उपनिरिक्षक चेतन श्रीवंत आदींच्या पथकाने वेगवेगळ्या पद्धतीने तपास सुरू केला.
मयत भालेराव यांच्या बँक खात्याची माहिती घेतली असता २०१९सालापासून वेगवेगळ्या प्रकारचा विमा पॉलिसी मयत भालेरावच्या नावावर काढल्याचे लक्षात आले. यावरून पोलिसांनी तपास पुढे नेला असता भालेरावच्या नावावर असलेल्या विमा पॉलिसीची रक्कम हडपण्यासाठी त्याचा मित्र संशयित मंगेश बाबुराव सावकार याने कट रचून संशयित आरोपी रजनी कृष्णदत्त उके , दिपक अशोक भारुडकर, किरण देविदास शिरसाठ, हेमंत शिवाजी वाघ, प्रणव राजेंद्र साळवे यांना अटक केली. यांची कसून चौकशी केली असता संशयित मंगेश याने कट रचून सुरुवातीला दुसऱ्या इसमाला मयत दाखवून विम्याची रक्कम हडपण्याची पुर्व कल्पना मयत अशोक यांना दिली. यानंतर त्यांच्याच नावावर विमा पॉलिसी काढून नंतर त्यांचाच काटा वरील साथीदारांच्या मदतीने संगनमताने काढल्याचे तपासात निष्पन्न झाले.
सावकार मंगेश याची कसून चौकशी केली असता त्याच्याकडे एक बेकायदेशीरपणे ठेवलेली पिस्तुल व सहा जीवंत काडतुसे पोलिसांना सापडली. पोलिसांनी ती जप्त केली आहेत. पोलिसांनी या संशयितांविरुद्ध खूनाच्या गुन्ह्यासह विमा कंपन्यांची फसवणक व अवैधरित्या अग्निशस्त्र वापरल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत.
सात दिवसांची पोलीस काेठडी -मुंबईनाका पोलिसांनी सहा संशयित आरोपींना बुधवारी (दि.१४) जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले. यावेळी दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेत न्यायालयाने सर्व संशयितांना येत्या २० तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. या गुन्ह्यात या संशयितांचे आणखी कोणी साथीदार आहेत का? याचाही शोध पोलिसांना घ्यावयाचा आहे. विम्याच्या रकमेचा केलेला अपहाराबाबतही सखोल चौकशी अद्याप करावयाची असल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.