जळगाव जामोद : तालुक्यातील मोहिदेपूर येथील नाथजोगी समाजाच्या तरुणाची रायगड जिल्ह्यातील उरण येथे १९ जून रोजी हत्या करण्यात आली.मोहिदेपूर येथील नाथ जोगी समाजाचे तरुण बहुरूप्यांची विविध रूपे धारण करून महाराष्ट्रातील अनेक गावात भिक्षा मागत फिरत असतात. त्यातून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. सन २०१२ मध्ये नागपूरच्या जरीपटका भागात अशा प्रकारे भिक्षा मागत असताना तीन तरुणांची त्या भागातील नागरिकांनी हत्या केली होती. नऊ वर्षानंतर अशीच घटना रायगड जिल्ह्यातील उरण पोलीस स्टेशन हद्दीत घडली. तेजराव शालिग्राम सोळंके (वय ३५) मोहिदेपुर येथील तरूण आपल्या परिवारासह त्या भागात राहत होता १९ जून रोजी तेजराव सोळंके व त्याचा सहकारी तेजराव वामन चव्हाण हे दोघे भिक्षा मागण्यासाठी बहुरूप्याच्या वेशात उरण येथे फिरत होते. दरम्यान त्यांची चुकामुक झाली. त्यानंतर रात्री तेजराव चव्हाण हा त्याच्या ठाणे जिल्ह्यातील कळवा येथे खोलीवर त्याला शोधण्यासाठी गेला. परंतु तेजराव सोळंके हा घरी परत आलाच नसल्याचे दिसुन आले. त्यानंतर तेजराव चव्हाण व मृतकांची पत्नी सुनीता यांनी उरण पनवेल व कळवा या पोलीस स्टेशनला तेजराव सोळंके हरविल्याची तक्रार दिली. त्यानंतर त्याचा मृतदेह उरण जेएनपीटी पोलीस स्टेशनच्या हद्दीत आढळून आला.
त्यानंतर त्याचा मृतदेह घेऊन पत्नी व मोहिदेपुरच्या नागरिकांनी बुलडाणा गाठले. नाथजोगी समाजाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक यांची भेट घेऊन माहिती दिली व निवेदन दिले. मारेकऱ्यांचा शोध लागत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका मोहीदेपुर वासियांनी घेतली होती. अखेर जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आश्वासनानंतर शवविच्छेदन करून मृतदेह ताब्यात घेण्यात आला आणि मोहिदेपुर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.तेजराव सोळंके याच्या मागे पत्नी व तीन मुले आहेत. तसेच तेजरावचे आई वडील हयात असून वडिलांच्या दोन्ही किडनी निकामी झाल्या आहेत.
माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी स्वीकारले पालकत्व
दोन दिवसापूर्वी जळगाव जामोद तालुक्यात शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी रयत क्रांती चे संस्थापक अध्यक्ष तथा माजी मंत्री आमदार सदाभाऊ खोत हे आले असताना त्यांनी मोहिदेपूर येथे या कुटुंबाची भेट घेतली आणि हा प्रश्न शासन दरबारी लावून धरण्याचे आश्वासन देत त्यांनी या कुटुंबातील सर्व सदस्यांची पालनपोषणाची व मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली. यामुळे या कुटुंबाला आधार मिळाला आहे. अनेक मान्यवरांनी मोहिदेपूर येथे भेट देत या कुटुंबाच्या समस्या जाणून घेतल्या आणि सहकार्य करण्याचे अभिवचन दिले.