मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ च्या रात्री भीषण दहशतवादी हल्ला मुंबईच नाही तर देशातील नागरिक कधीही विसरु शकत नाहीत. या हल्ल्याच्यावेळी पोलिसांनी जीवाची बाजी मारली. अनेक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी शहीद झाले. या हल्ल्यावेळी शस्त्र आणि दारूगोळा शोधण्यात कॅनिंग सैनिक असलेल्या श्वानांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. या कामात अशीच महत्त्वपूर्ण भूमिका निभावणाऱ्या निवृत्त कॅनिंग सैनिक असलेल्या 'नॉटी' या श्वानाचा मृत्यू झाला आहे. नॉटीने सोमवारी (१० मे) अखेरचा श्वास घेतला. तो १४ वर्षांचा होता.
पालघरमधील सफाळे येथील माजी रणजीपटू राजेश सुतार यांनी त्याला दत्तक घेतलं होतं. ब्लॅक लॅबरेडॉर जातीचा असलेला नॉटी हा २०१४ मध्ये सेवानिवृत्त झाला होता. लष्कर ए तोयबाचा दहशदवादी अजमल कसाब याने लपवलेला शस्त्रसाठा आणि दारुगोळा याच श्वानाने शोधून काढला होता. नॉटी अचानक आजारी पडला. त्याचे वय १४ वर्ष इतकं पूर्ण झालं होतं. बॉम्बे वेटरनरी कॉलेज, लोअर परेल स्पंदन या स्वयंसेवी संस्थेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात नॉटीला शौर्य पुरस्कार मिळाला होता. नॉटीचा मृत्यू झाला असला तरी त्याने बजावलेली कामगिरी नक्कीच स्मरणात राहील.
२६/११ या दहशतवादी हल्ल्यातील हल्ले करणाऱ्या १० पैकी ९ दहशतवाद्यांना मुंबई पोलीस आणि एनएसजीच्या कमांडोंनी कंठस्नान घातले तर अजमल आमीर कसाब हा दहशतवादी पोलिसांच्या तावडीत जिवंत सापडला. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार सर्व हल्लेखोर पाकिस्तानी होते आणि या हल्ल्यांमागे लष्कर-ए-तोयबा या पाकिस्तानी दहशतवादी संघटनेचा हात होता.