मडगाव: तीन वर्षांपूर्वी बोगमोळो वास्को येथील अवधेश शर्मा या नौदल अधिकाऱ्याच्या बंगल्यावर दरोडा टाकून सुमारे पावणे सहा लाखांचा ऐवज लुटल्याचा आरोप असलेल्या सहा संशयितांना ओळखपरेडीतल्या त्रुटींतील संशयाचा फायदा देत बुधवारी दक्षिण गोवा प्रधान सत्र न्यायाधीश बी. पी. देशपांडे यांनी निर्दोष मुक्त केले.
या प्रकरणात संशयितांची बाजू ऍड. विनय पाटकर यांनी मांडली. ह्या सहापैकी तक्रारदाराने दोघांची ओळख पाठविली होती. मात्र हा दरोडा पहाटे तीन वाजता काळोखात पडला होता आणि त्यावेळी सर्वांनी आपली तोंडे कपड्यांनी झाकून घेतली होती असे साक्षीदाराने आपल्या साक्षीत म्हटले होते याकडे ऍड.पाटकर यांनी न्यायालयाचे लक्ष वेधताना काळोखात तोंड झाकलेल्या अवस्थेतील आरोपींची ओळख कशी पटवता येणे शक्य आहे असा सवाल करीत ही साक्ष संशयास्पद असल्याचा दावा केला. न्यायालयाने हा दावा उचलून धरला. या प्रकरणात तपास अधिकारी असलेले पोलीस निरीक्षक नोलास्को रापोझ यांनी 15 साक्षीदार पेश केले होते.
हा दरोडा 27 डिसेंबर 2017 रोजी पडला होता. या घटनेच्या सहा महिन्यानंतर पोलिसांनी अलिसाब कोलमणी, सिकंदर, नियाझ शेख, शिर्शन राठोड, अस्लम कलगर आणि रवी हरिकांत या सहा जणांना अटक केली होती. या घटनेची हकीकत अशी की, आयएनएस हंस या वास्को येथील नौदलाच्या तळावर काम करणारा अवधेश शर्मा आपली पत्नी चारु हिच्यासह बोगमोळो येथील एका बंगल्यात भाड्याने राहत होता. 27 डिसेंम्बर रोजी तो आपल्या खोलीत पत्नीसह झोपलेला असताना पाहाटे तीनच्या सुमारास तो आवाजाने जागा झाला असता पाच व्यक्ती त्यांच्या बेडरूममध्ये आत शिरत असताना त्यांना दिसल्या. त्यांच्याकडे सुरे आणि अन्य शस्त्रे होती. त्यापैकी चार जणांनी अवधेश याला पकडून ठेवून त्याची पत्नी चारु हिला धमकावून सोने आणि इतर ऐवज असा 5.75 लाखांचा ऐवज लुटून पळ काढला.
या सहा महिन्यानंतर सहा जणांना अटक केल्यानंतर वास्को पोलिसांनी संशयितांच्या सांगण्यावरून कारवार येथून एक सोन्याची चेन जप्त केली होती पण तक्रारदाराची पत्नी चारु शर्मा हिने ही चेन आपली नसल्याचे न्यायालयात सांगितल्याने त्याचाही संशयिताला फायदा मिळाला.