लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: मजेसाठी पामबीच मार्गावर मोटरसायकलने फेरफटका मारण्यासाठी गेलेल्या तिघांच्या अपघाताची घटना रविवारी मध्यरात्री घडली. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला असून त्यात एक अल्पवयीन आहे. मोटारसायकल अति वेगात असल्याने नियंत्रण सुटून त्यांचा अपघात घडला. रविवारी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास पामबीच मार्गावर सरसोळे लगत हा अपघात घडला आहे. बेलापूर कडून वाशीला जाणाऱ्या दुचाकीचा भीषण अपघात झाला असल्याची माहिती नेरुळ पोलिसांना मिळाली होती. त्याद्वारे पोलिसांनी त्याठिकाणी धाव घेतली असता दुभाजकामध्ये तिघेजण जखमी अवस्थेत पडल्याचे दिसून आले. त्यांना रुग्णालयात दाखल केले असता, मध्यरात्रीच्या सुमारास एकाला मृत घोषित करण्यात आले. तर सोमवारी सकाळी दुसऱ्या जखमीचा देखील मृत्यू झाला. तिसऱ्याची देखील प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
राजा जाना (१६) व राजेश गुप्ता (३०) अशी मृत पावलेल्यांची नावे आहेत. तर शवान मुल्ला (२१) य याच्यावर उपचार सुरु आहेत. तिघेही सानपाडा परिसरात राहणारे असून रविवारी रात्री सहज फेरफटका मारण्यासाठी मोटरसायकलने पामबीच मार्गावर गेले होते. सीवूड येथील चौकातून ते परत सानपाडाकडे वळले होते. यावेळी मोटरसायकल अति वेगात असल्याने सरसोळे येथे नियंत्रण सुटल्याने मोटरसायकल दुभाजकामधील झाडाला धडकून त्यांचा अपघात झाला. अपघातावेळी मोटरसायकल कोण चालवत होता हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.