नवी मुंबई - भुवनेश्वर येथील बहुचर्चीत बलात्काराच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी तब्बल २२ वर्षांनी पोलिसांच्या हाती लागला आहे. नाव बदलून अँबी व्हॅली येथे तो राहत असल्याची माहिती भुवनेश्वर पोलिसांना मिळाली होती. त्यांनी नवी मुंबई पोलिसांची मदत मागितली असता गुन्हे शाखेने शिताफीने त्याचा शोध घेऊन अटक केली आहे.
भुवनेश्वर येथील महिला वनसेवा अधिकाऱ्यावर बलात्काराची घटना जानेवारी १९९९ मध्ये घडली होती. या घटनेनंतर पिडीत महिलेच्या काही आरोपांवरून देशभर खळबळ उडाली होती. परिणामी ओरिसाच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांची बदली झाली होती. घटनेच्या काही दिवसातच भुवनेश्वर पोलिसांनी प्रदीप साहू व धीरेंद्र मोहंती या दोघांना अटक केली. मात्र गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार बिबन बिस्वाल हा सीबीआय किंवा पोलिसांच्या हाती लागला नव्हता. दरम्यान २००२ मध्ये न्यायालयाने अटकेत असलेल्या दोघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
काही दिवसांपूर्वी जालंधरा स्वैन नावाची व्यक्ती महाराष्ट्रातून फरार आरोपी बिबन बिस्वाल याच्या कुटुंबियांना पैसे पाठवत असल्याचे भुवनेश्वर पोलिसांच्या निदर्शनास आले. यामुळे भुवनेश्वर पोलिसांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तांना याबाबत कळवले होते. त्यानुसार गुन्हे शाखा उपायुक्त प्रवीणकुमार पाटील यांनी गुन्हे शाखेच्या पथकाद्वारे तपासाला सुरवात केली होती. त्यामध्ये पैसे पाठवणारी व्यक्ती लोणावळा येथील अँबी व्हॅली परिसरात असल्याचे समोर आले. त्यानुसार पुणे ग्रामीण पोलिसांची मदत घेऊन गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी संपूर्ण अँबी व्हॅली परिसर पिंजून काढला. त्यात हाती लागलेला जालंधरा स्वैन हाच बहुचर्चीत गुन्ह्यातील मुख्य फरार आरोपी बिबन बिस्वाल असल्याचे उघड झाले. यानुसार त्याला भुवनेश्वर पोलिसांमार्फत सीबीआयच्या ताब्यात दिले आहे. तो अनेक वर्षांपासून तिथे प्लम्बर कामगार म्हणून वास्तव्य करत होता. बदलेल्या नावाने त्याने स्वतःची बनावट कागदपत्रे देखील तयार केली आहेत. त्यावर स्वतःच्याच मूळ गावाचा उल्लेख केला होता. परंतु त्या नावाची व्यक्ती सदर गावात नसल्याने त्याचे बिंग फुटले.