वैभव गायकर
पनवेल - अश्विनी बिद्रे हत्याकांडातील आरोपींना सोमवारी शिक्षा सुनावण्यात आली. यावेळी न्यायालयाने हत्याकांडातील तपास अधिकाऱ्यांवर कडक शब्दांत ताशेरे ओढून त्यांच्या खातेनिहाय चौकशीचे आदेश नवी मुंबई पोलिस आयुक्तांना दिले. यावेळी अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. जी. पालदेवार यांनी तपास अधिकाऱ्यांवर ठपका ठेवून ते अधिकारी योग्य तपास करण्याऐवजी भारतभ्रमण करीत राहिल्याचे सांगून ‘बगल मे छोरा, गाव मे ढिंढोरा’ असा प्रकार करीत राहिल्याचे न्यायमूर्ती म्हणाले.
नवी मुंबई पोलिस दलातील तपास अधिकारी कोंडीराम पोपेरे, सुरवसे, तुषार जोशी, प्रकाश निलेवाड, तत्कालीन पोलिस आयुक्त हेमंत नगराळे या अधिकाऱ्यांनी तपासात अक्षम्य केले. गुन्हा दाखल झाल्यानंतरही अभय कुरुंदकरला अटक केली नाही. अधिकाऱ्यांनी तपासात निष्काळजीपणा झाल्याचे न्यायालय म्हणाले.
तपासात हलगर्जीपणा करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई झाली पाहिजे. तत्कालीन पोलिस आयुक्तांविरोधात तक्रारदार यांची पुन्हा तक्रार नोंदवून पुन्हा चौकशीचे आदेश न्यायालयाने दिले. मुख्य आरोपीला जन्मठेप सुनावली. मात्र, काही सवलतीचा फायदा त्याला होणार आहे. त्याचा अभ्यास करून पुन्हा अपिलाबाबत निर्णय घेऊ. - प्रदीप घरत, विशेष सरकारी वकील
कधीच गुन्ह्याला वाचा फुटली असती पुन्हा एकदा न्यायमूर्ती पालदेवार यांनी कुरुंदकर यांची राष्ट्रपती पदकासाठी केलेल्या शिफारशीबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तपासातील दुर्लक्षामुळे त्याचा फायदा आरोपीला झाला. त्यामुळेच अश्विनी बिद्रे यांचा मृतदेह सापडला नाही. जेव्हा बिद्रे बेपत्ता झाल्या, तेव्हा कुरुंदकर याचा या बेपत्ता होण्यामागे रोल दिसत होता. तेव्हा त्याची चौकशी केली असती तर या गुन्ह्याला कधीच वाचा फुटली असती, असे सरकारी वकील प्रदीप घरत यांनी सांगितले. मात्र, तपास अधिकाऱ्यांनी त्यादिशेने तपास केला नसल्याने खटल्यावर परिणाम झाला.
त्याच्या मोबाइलच्या सीडीआरमधून सर्व घटनाक्रम बाहेर आले असते. मात्र, ती तसदी न घेता तपास अधिकारी वेळकाढूपणा करीत राहिल्याने तपासात निष्काळजीपणा झाल्याचे न्यायालय म्हणाले.