- सूर्यकांत वाघमारे,
नवी मुंबई : स्मार्ट सिटीची सागरी सुरक्षा उघड्यावर पडल्याचे दिसून येत आहे. सागरी गस्तीसाठी पोलिसांना देण्यात आलेल्या सातही बोट सद्यस्थितीला नादुरुस्त अवस्थेत पडून आहेत. त्यापैकी चार बोट मागील तीन वर्षांपासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत पडून आहेत. त्यामुळे नवी मुंबईचा १४४ किमी क्षेत्रफळाचा सागरी किनारा उघड्यावर पडला असून, त्याचा फायदा समुद्री मार्गे गैर हालचाली करणाऱ्यांकडून घेतला जात आहे.
मुंबईवर झालेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर मुंबईसह लगतच्या शहरांच्या सागरी सुरक्षेवर अधिक भर देण्यात आला होता. त्यात नवी मुंबईचा प्राधान्याने समावेश होता. समुद्री मार्गे मुंबईत घुसू पाहणाऱ्या दहशतवाद्यांकडून नवी मुंबईच्या सागरी किनाऱ्यांचा वापर होऊ शकतो. अशी संभाव्य हालचाल टाळण्यासाठी नवी मुंबईच्या सागरी सुरक्षेसाठी पोलिसांच्या ताफ्यात ७ स्पीड बोट देण्यात आल्या होत्या. मात्र सातत्याने बोटींमध्ये होणारे बिघाड यामुळे स्मार्ट सिटीची सागरी सुरक्षा सतत उघड्यावर पडत आहे. अशातच मागील अनेक दिवसांपासून सातही बोटी नादुरुस्त अवस्थेत पडून असल्याचे दिसून आले आहे.
चार बोट २०१८ पासून दुरुस्ती अभावी वापराविना सीबीडी येथील जेट्टीवर उभ्या करण्यात आलेल्या आहेत. त्यापैकी एक बोट पूर्णपणे खराब झालेली असून तिची दुरुस्ती देखील शक्य नाही. उर्वरित चार बोटींवर नवी मुंबईच्या सुमारे १४४ किमी सागरी क्षेत्रफळाच्या सुरक्षेची मदार सांभाळली जात होती. त्यातही डिझेल अभावी अनेकदा या बोट बंदच असायच्या. अशातच मागील दोन वर्षांपासून उर्वरित चारपैकी तीन बोट मध्ये बिघाड झाल्याने, एकाच बोटीच्या आधारे सागरी सुरक्षेचा दिखावा केला जात होता. कालांतराने तिच्यात देखील बिघाड झाल्याने मागील काही दिवसांपासून नवी मुंबईची सागरी सुरक्षा उघड्यावर पडली आहे.
यामुळे गस्तीसाठी पर्याय म्हणून वेळप्रसंगी भाड्याची ट्रॉलर वापरली जात आहे. परंतु १४४ किमी लांब पर्यंत पसरलेला किनारा व ५ किमी समुद्रात आतपर्यंत भाड्याच्या ट्रॉलरने गस्त घालण्यात मर्यादा येत आहेत. अशावेळी एखादी संशयित बोट दिसल्यास तिचा पाठलाग देखील पोलीस करू शकणार नाहीत. दरम्यान नादुरुस्त अवस्थेत असलेल्या बोटींच्या दुरुस्तीसाठी शासनाकडे पाठपुरावा झाला असून, लवकरच त्यांची दुरुस्ती केली जाईल असे आश्वासन सागरी पोलिसांना मिळत आहे. प्रत्यक्षात मात्र दुरुस्ती नंतरही त्या किती काळ साथ देतील याबाबत साशंकता व्यक्त होत आहे.
सप्टेंबर २०१६ मध्ये उरणमध्ये समुद्री मार्गे दहशतवादी घुसल्याच्या संशयातून संपूर्ण देशाचे लक्ष नवी मुंबईकडे लागले होते. तर या दशतवाद्याच्या शोधात उरण व लगतच्या परिसराला लष्करी छावणीचे स्वरूप आले होते. प्रत्यक्षात मात्र काहीच हाती न लागल्यानंतर अनेक दिवसांनी त्याठिकाणचे सैन्य हटवण्यात आले होते.
नवी मुंबईच्या सागरी किनाऱ्याला लागूनच जे.एन.पी.टी बंदर, ओ.एन.जी.सी. प्रकल्प, तसेच एलिफंटा बेटालगतचा तेल साठा अशी महत्वाची ठिकाणे आहेत. त्यामुळे मुंबई इतकेच नवी मुंबईच्या सागरी सुरक्षेला महत्व दिले जाते. त्यानंतरही स्पीड बोटी अभावी सागरी वाऱ्यावर सोडण्यात आली आहे. याच संधीचा फायदा दहशतवाद्यांकडून घेतला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दोन बोट दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. लवकरच सर्व बोटींची दुरुस्ती केली जाणार आहे.
- बिपीनकुमार सिंह,
पोलीस आयुक्त- नवी मुंबई.