नवी दिल्ली : Navjot Singh Sidhu road rage case: काँग्रेसचे पंजाबमधील नेते आणि माजी भारतीय क्रिकेटपटू नवजोत सिंग सिद्धू यांच्या अडचणी वाढल्या आहेत. 34 वर्षांपूर्वी सिद्धू आणि त्यांच्या एका मित्राने केलेल्या मारहाणीत गुरनाम सिंगच्या नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी सिद्धू यांना सर्वोच्च न्यायालयाने १ वर्षाची शिक्षा सुनावली आहे. नवज्योत सिंग सिद्धूने शुक्रवारी पटियाला न्यायालयात आत्मसमर्पण केले. सिद्धूचे मीडिया सल्लागार सुरिंदर डल्ला यांनी सांगितले की, नवज्योत सिंग यांनी मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर आत्मसमर्पण केले आहे. त्यांची वैद्यकीय तपासणी आणि इतर कायदेशीर प्रक्रिया केल्या जात आहेत. पतियाला येथे 27 डिसेंबर 1988 रोजी कार पार्किंगवरून नवज्योत सिंग सिद्धूचे 65 वर्षीय गुरनाम सिंग यांच्याशी भांडण झाले होते. सिद्धूने त्याला धक्काबुक्की केली, नंतर गुरनाम सिंगचा मृत्यू झाला. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने सिद्धूला एक वर्षाची शिक्षा सुनावली आहे.
याआधी त्याने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करून आत्मसमर्पण करण्यासाठी काही आठवड्यांचा अवधी मागितला होता. सिद्धू याने त्याच्या प्रकृतीबाबत कारण पुढे केले होते. त्याचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी या याचिकेवर सरन्यायाधीश एन. व्ही. रमण यांच्याकडे लवकर सुनावणीची मागणी केली होती, परंतु सरन्यायाधीशांनी लवकर सुनावणीस नकार दिला. याप्रकरणी मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांनी सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल केली आहे.