मुंबई - कांदिवलीत शुक्रवारी उशीरा रात्री गोळीबाराची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. मोटर सायकल वरून आलेल्या दोघांनी हा गोळीबार केला असून त्यात १ जण मृत्यु मुखी पडला असून अन्य तिघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना जवळच्या शताब्दी रूग्णालयात दाखल करण्यात आले असून गणेशोत्सव दरम्यान झालेल्या वादात हा सगळा प्रकार घडल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
कांदिवलीच्या लालजीपाडा परिसरात रात्री सव्वा बाराच्या सुमारास हा प्रकार घडला. परिमंडळ ११ चे पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर यांनी या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला असून या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे पत्रकारांशी बोलताना सांगितले. सूत्रांच्या म्हणण्यानुसार,मयत तरुण हा लालजी पाडा येथील जय भारत इमारती मध्ये राहत होता. शुक्रवारी रात्री सोनू पासवान नामक आरोपी हा त्याच्या अन्य साथीदारासोबत मोटर सायकल वरून आला आणि त्याने हा हल्ला केला. जखमींना उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पोलीस सीसीटिव्ही फुटेज पडताळणी करत आहेत.